जगन्नाथ रथयात्रेत चेेंगराचेंगरी;तिघांचा मृत्यू; ५० जखमी   

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकाची बदली

भुनवेश्वर : ओडिशातील जगन्नाथ रथयात्रेच्या तिसर्‍या दिवशी रविवारी सकाळी गुंडाची मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली. त्यात तीन भाविकांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जखमी झाले. मुख्यमंत्री मोहन माझी यांनी घटनेची गांभिर्याने दखल घेत जिल्हाधिकारी सिद्धार्थ शंकर स्वेन आणि पोलिस अधीक्षक विनीत अग्रवाल यांच्या बदलीचे आदेश दिले. तसेच मृत आणि जखमींना आर्थिक मदतही जाहीर केली. 
 
भगवान जगन्नाथ रथयात्रेला शुक्रवारी प्रारंभ झाला होता. शनिवारी ती गुंडाची मंदिर परिसरात पोहोचली होती. काल पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शेकडोंच्या संख्येने रथोत्सव पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी आले होते. तेव्हा चेंगराचेंगरी झाली.त्यात दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला. रथ उभे असलेल्या ठिकाणी दोन मालमोटारी आल्या होत्या. त्यामध्ये धार्मिक अनुष्ठानाचे साहित्य होते. त्यामुळे चेंगराचेंगरीत भर पडली. दरम्यान, भगवान जगन्नाथ यांच्या मूर्तीसमोरील पडदा हटविण्याचा धार्मिक कार्यक्रम आयोजित सुरू होता. तेव्हा देवाचे दर्शन व्हावे, यासाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिर परिसरात आले होते.
 
दरम्यान, चेंगराचेगरी ही केवळ निष्काळजीपणामुळे झाली. ती माफी देण्यायोग्य नसल्याचे सांगत मुख्यमंत्री माझी यांनी जिल्हा पोलिस अधिकारी बिष्णू पटी आणि कमांडंट अजय पाढी यांना निलंबित करत असल्याचे जाहीर केले. तसेच  कुर्डा जिल्हाधिकारीपदी चंचल राणा यांची तर पोलिस अधीक्षकपदी पिनाक मिश्रा यांची तातडीने नियुक्ती देखील केली. तसेच प्रशासकय चौकशीचे आदेशही त्यांनी दिले. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. दरम्यान, चेंगराचेंगरीनंतर सरकारने आता अनुचित घटना रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. त्या अंतर्गत  रथयात्रेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी सर्वसाधारण प्रशासक विभागाने अधिसूचना काढली आहे. ज्येष्ठ  नोकरशाह अरविंद अग्रवाल यांची त्यासाठी नियुक्ती केली.

Related Articles