राजस्तानात सीमेजवळ अमली पदार्थ जप्त   

बारमेर : पंजाब पोलिसांनी सोमवारी राजस्तानमधील बारमेर येथील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि राजस्तान पोलिसांसोबत संयुक्त कारवाईत एका ड्रग्ज टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून ६० किलोपेक्षा जास्त अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पोलिस महासंचालक (डीजीपी) गौरव यादव यांनी ही माहिती दिली.
 
यादव म्हणाले, या प्रकरणात पंजाब, हरियाणा, राजस्तान आणि जम्मू-काश्मीरमधून एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.यादव यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत सांगितले, की एका मोठ्या कारवाईत, अमृतसर आयुक्तालय पोलिसांनी बीएसएफ आणि राजस्तान पोलिसांच्या सहकार्याने पाकिस्तानी तस्कर तनवीर शाह आणि त्याचा कॅनडास्थित हँडलर जोबन कालेर यांनी चालवलेल्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्जचा चोरटा व्यापार करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला आहे. राजस्तानमधील बारमेर येथील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ ६०.३०२ किलो हेरॉइनचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, राजस्तान आणि जम्मू-काश्मीरमधून नऊ प्रमुख सदस्य (टोळीचे) आणि हवाला ऑपरेटरना अटक करण्यात आली. 

Related Articles