सोनमला मदत करणार्‍या रखवालदाराला अटक   

नवी दिल्ली : राजा रघुवंशीची हत्या होऊन सोमवारी महिना पूर्ण झाला. सोनम रघुवंशी राजाची हत्या घडवून आणल्यानंतर इंदूरमधील ज्या फ्लॅटवर येऊन लपली होती, हा फ्लॅट दाखविणारा एजंट आणि रखवालदाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आता राजाच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ही सात झाली आहे. 
 
सिलोम जेम्सला रविवारी पोलिसांनी अटक केली. सिलोम जेम्स हा भोपाळला पळून जाण्याच्या बेतात होता पण त्याला पोलिसांनी अटक केली. तसेच इमारतीच्या रखवालदारालाही पोलिसांनी अटक केली आहे. बलवीर अहिरवर असे या रखवालदाराचे नाव आहे. राजाची हत्या केल्यानंतर सोनम ज्या इमारतीत लपली होती त्याच इमारतीचा हा रखवालदार आहे. तो सुतारकामही करतो अशी माहिती पोलिसांनी दिली. बलवीर हा कृष्ण विहार सोसायटीत वॉचमन म्हणून काम करतो आणि तो  सुतारकामही करतो. आम्ही त्याला अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी एका वृत्तसंस्थेला दिली. पोलिसांनी बलवीर आणि सिलोम जेम्स या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

सिलोम जेम्सकडे सोनमने दिलेल्या पेटीत काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलोम जेम्सकडे सोनमने एक पेटी दिली होती. त्या पेटीत दागिने, लॅपटॉप आणि राज कुशवाहाने जे हत्यार आणले होते ते असू शकते. ही पेटी सिलोमने नष्ट केली आहे. त्यातल्या वस्तू कुठे आहेत? याची चौकशी आता पोलीस करत आहेत. सिलोम जेम्सने ही पेटी ज्या ठिकाणी जाळली त्या ठिकाणी त्याने पोलिसांना नेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिथे त्यांना लॅपटॉप किंवा दागिने जाळल्याच्या कुठल्याही खुणा किंवा अवशेष मिळाले नाहीत. त्यामुळे आता पेटीतले सामान नेमके कुठे आहे? याची चौकशी सुरू आहे. विशाल चौहानने १७ हजार रुपये प्रति महिना भाडे तत्त्वावर हा फ्लॅट घेतला होता. २३ मे रोजी राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह २ जून रोजी आढळून आला होता. राजाची हत्या कशी करायची हे सोनम आणि तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहा या दोघांनी आधीच कट करून ठरवले होते.
 

Related Articles