’ससून’च्या शेजारी उभारणार कर्करोग रुग्णालय   

पुणे : पुण्यात शासकीय कर्करोग रुग्णालय उभे करण्यासाठी ससून रुग्णालयासमोरील मंगळवार पेठेतील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) जागा ही वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतर करण्यात येणार असून त्या ठिकाणी ४०० खाटांचे रुग्णालय बांधण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
 
ससून रुग्णालयातील समस्या, प्रलंबित मागण्या याबाबत मिसाळ यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात ससून रुग्णालयातील अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. बैठकीला आमदार हेमंत रासने, ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, उपअधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
 
मिसाळ यांनी ससून रुग्णालयाच्या कार्यप्रणालीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. कर्करोग रुग्णालयाच्या जागेबाबत त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ‘एमएसआरडीसी’ची जागा ही पुन्हा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव ‘एमएसआरडीसी’ला दिला आहे. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतही बैठका झाल्या असून ही जागा पुन्हा मिळणार आहे. परंतु, ही जागा प्रत्यक्षात कधी मिळेल याबाबत त्यांनी ठोस माहिती दिली नाही.
 
कर्करोगाच्या इमारतीबाबत माहिती देताना ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार म्हणाले की, ४०० खाटा असलेली कर्करोगाची इमारत उभी करण्यासाठी ८६० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. त्यामध्ये इमारत, विद्युतीकरण, रुग्णवाहिका, वैद्यकीय साधनसामुग्री, मनुष्यबळ, रेडिएशन सामग्री, संरक्षक भिंत, निर्जंतुकीकरण यंत्रणा आदींचा समावेश आहे.

Related Articles