दर्शनासाठी पैसे घेणार्‍यांविरुद्ध तक्रार नोंदवा   

भीमाशंकर देवस्थान व पोलीस प्रशासनाचे भाविकांना आवाहन

भीमाशंकर,(वार्ताहर) : श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी अनेक ठिकाणांहून तसेच इतर राज्यांमधून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. या भाविकांकडून काही व्यक्ती, दलालांकडून पैसे उकळण्याचा प्रकार घडत आहे. याबाबत भीमाशंकर देवस्थान व पोलीस प्रशासन यांनी भाविकांना तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. 
 
दर्शनबारीत उभे असणार्‍या भाविकांना जाणून-बजून त्या ठिकाणी उशीर करायचा आणि दर्शनासाठी जास्त वेळ लागण्याची भीती दाखवायची व लवकर दर्शन करून देतो म्हणून पैसे मागायचे अन् भाविकांना मंदिराच्या मागील बाजूने किंवा राम मंदिराच्या समोरील गेटमधून दर्शनासाठी सोडायचे. यासाठी कोणतीही पावती न देता दलाल भाविकांकडून पाचशे, एक हजार, दोन हजार याहूनही अधिक पैसे वसूल करत आहेत. मंदिराजवळील वाहनतळ जाणून बुजून मोकळे ठेवले जातात अन् मंदिराच्या लांब असणार्‍या वाहनतळांमध्ये मोटारी लावायला सांगतात. वाहनतळांपासून मंदिराकडे दोन ते चार किलोमीटर जाण्यासाठी एक खासगी वाहन ठेवले जाते. 
 
यामध्ये दहा जण किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांना बसविले जाते. ज्या राज्यातील भाविकांकडून त्याप्रमाणे पन्नास रुपयांपासून ते पाचशे रूपयांपर्यंत दहा मिनिटांच्या अंतरासाठी पैसे घेतले जात होते. यामध्ये एखाद्या भाविकाने गाडी मंदिराकडे नेण्याचा प्रयत्न केला तर येथील खासगी वाहनचालक आपली मोटार त्याच्या मोटारीस आडवी लावत त्यास वाहनतळांवर मोटारी लावण्यास भाग पाडत होते. यामध्ये जर एखाद्या भाविकाने मोटार पुढे नेली तर बसस्थानकासमोर बॅरेकेट लावून बसलेले दलाल, एजंट संबंधित मोटारी मंदिरापर्यंत सोडण्यासाठी हजारो रुपये भाविकांकडून उकळत होते. 
 
शासनाकडून विविध स्तरांवर देवस्थान विकासाचे प्रयत्न सुरू असताना देखील जाणून-बुजून काही नागरिकांमुळे भीमाशंकर देवस्थान बदनाम होत आहे. केवळ रोजगार आणि पोट भरण्याचे साधन अशी कारणे सांगणारे दलाल, एजंट हे कष्ट न करता पैसे कमावण्याचे साधन म्हणून भीमाशंकर देवस्थान याठिकाणी येणार्‍या श्रद्धाळू भाविकांकडे पाहत आहेत. दिवस-रात्र आपल्या दुकानात बसून दुकानदार देखील एवढे पैसे कमवत नसतील त्याहून अधिक पैसे हे लवकर दर्शन देणारे दलाल कमवत होते. 
 
आता देवस्थानने भाविकांनी दर्शनासाठी एजंट, दलाल व व्यावसायिक व्यक्ती यांना पैसे देऊ नयेत, तसेच दर्शनासाठी व मंदिराकडे गाडी सोडण्यासाठी कोणालाही पैसे दिल्यास त्यास संस्थान जबाबदार राहणार नाही, असे फलक लावले आहेत तर पोलीस प्रशासनाने कोणत्याही व्यक्तीने दर्शन घेण्यासाठी व वाहन पार्किंगमध्ये लावण्यासाठी पैसे मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
 

Related Articles