पुरी रथयात्रेदरम्यान ६०० हून अधिक भाविक आजारी   

भुवनेश्वर : ओडिशातील पुरी येथे झालेल्या रथयात्रेदरम्यान कडक उन्हाळा आणि गर्दीमुळे जवळपास ६२५ यात्रेकरू आजारी पडले. त्यामधील अनेकांना पुरी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करावे लागले.  
 
पुरीचे मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सत्पथी म्हणाले, गर्दी, तीव्र उष्णता आणि आर्द्रतेमुळे अनेक यात्रेकरूंना उलट्या, बेशुद्ध पडणे तसेच किरकोळ दुखापतीच्या समस्या जाणवल्या. बहुतेक यात्रेकरूंना प्रथमोपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले. पुरी येथील जिल्हा मुख्यालय रुग्णालयात सुमारे ७० जणांवर उपचार सुरू आहेत, त्यापैकी नऊ जणांची प्रकृती गंभीर आहे. सुदैवाने या यात्रेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
  
बालागंडी परिसरात भगवान बलभद्रचा रथ आणि तलध्वज एक तासाहून अधिक काळ अडकून पडला होता. त्यामुळे तिथे गर्दी जमली. या गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना अनेकांना उष्णतेचा आणि आर्द्रतेचा त्रास झाला. मंदिराजवळ प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्यात आली होती. तिथे यात्रेकरूंना पाणी आणि ग्लुकोजची पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, गर्दीतून वाट काढणे यात्रेकरूंना शक्य नव्हते.

Related Articles