हाजीअलीजवळ समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू   

मुंबई : मुंबईतील हाजी अलीजवळील लोटस जेट्टी परिसरात अस्थीविसर्जन करताना खवळलेल्या समुद्राच्या लाटांमुळे तिघेजण समुद्रात बुडाले. त्यापैकी एकाला वाचविण्यात यश आले असून, दोघांचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. संतोष विश्वेश्वर (वय ५१) कुनाल कोकाटे (४५) अशी मृतांची नावे आहेत. संजय सर्वणकर (५८) यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. 
 
एमएसईबीचे कर्मचारी आणि कबड्डी प्रशिक्षक संतोष विश्वेश्वर यांच्या आईचे  रविवारी बारावे होते. त्यांच्यासह तिघेजण आईच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी लोटस जेट्टी परिसरात समुद्रात उतरले होते. मागील पाच दिवसांपासून मुंबईच्या समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. अस्थी विसर्जन करत असताना खवळलेल्या समुद्राच्या लाटांमुळे तिघेजण समुद्रात बुडाले. तिघे बुडत असताना स्थानिक मच्छीमार आणि पोलिसांनी तत्परतेने तिघांनाही पाण्यातून बाहेर काढले आणि  नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यापैकी दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

Related Articles