महामार्गावरील भरधाव वाहने बिबट्यांच्या जिवावर   

२६ बिबट्यांचा मृत्यू

सुरेश भुजबळ

बेल्हे : जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यांतील तीन राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते ओलांडताना भरधाव वाहनांमुळे माणसासह वन्यजीव प्राण्यांनीही आपला जीव गमावला आहे. बिबट, कोल्हा, लांडगा, तरस या वन्यजीव प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत. तर, काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे.
 
जुन्नर वनविभागाच्या अहवालानुसार १ जानेवारी २०२२ ते ३१ मे २०२५ या कालावधीत खेड ते सिन्नर, अहिल्यानगर ते कल्याण व पुणे ते अहिल्यानगर या तीन महामार्गांवर रस्ता ओलांडताना २६ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.
 
देशात सर्वाधिक बिबट प्रवण क्षेत्र जुन्नर वनविभागअंतर्गत जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यात आहे. जवळपास प्रत्येक गावात किमान चार ते पाच बिबट्यांचा वावर असून, दरवर्षी बिबट्यांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, महामार्गावर रस्ता ओलांडताना २६ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात १७ नर ९ मादी बिबट्यांचा समावेश आहे.
 
प्राणी पाण्याच्या शोधात किंवा भक्ष्याच्या मागे भटकंती करत असतात. राष्ट्रीय महामार्गावर २४ तास वाहतूक सुरू असल्यामुळे दिवसेंदिवस वन्य जीव-प्राण्यांच्या मृत्यूचे वाढत असलेले प्रमाण चिंताजनक आहे. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावरील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने योजना आखून त्यांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी वनविभागचे वरिष्ठ, पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांनी केली आहे.
 
पाणवठे उभारणे-जानेवारी ते जून या कालावधीत राष्ट्रीय महामार्गांच्या जवळ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणवठे उभारावेत. जनजागृती मोहिमा-वन्यजीव रस्ता ओलांडताना वाहन थांबवण्याविषयी वाहनचालकांमध्ये जागरूकता निर्माण करावी. गतिरोधक व सूचनाफलक-बिबट व अन्य वन्यजीवांची वावर असलेल्या ठिकाणी वेगमर्यादा कमी करणारे ठळक व मोठे फलक लावावेत व गतिरोधक करावेत.

या ठिकाणी भूमिगत पायवाटांची गरज

आळंदी-चाकण रस्त्याच्या बाजूला घनदाट जंगल आहे. या ५ किलोमीटर अंतरात खेड ते अवसरी घाट, मंचर ते कळंब, एकलहरे ते नारायणगाव व पिंपळवंडी ते आळेफाटा या मार्गावर किमान आठ किलोमीटर अंतरावर.
 
आणे ते माळशेज घाट महामार्गावर माळशेज घाट, पिंपळगाव जोगा, ओतूर, खामुंडी, आळे, बेल्हे व आणे या परिसरात.
पुणे ते अहिल्यानगर मार्गावर खंडाळा व कोंढापुरी (ता. शिरूर) परिसरात.

ही अपघाताची ठिकाणे व मृत्यू झालेल्या बिबट्याची संख्या

मंचर ते आळेफाटा मार्ग ११ बिबटे
विविध इतर मार्ग ८ बिबटे
ओतूर-खामुंडी परिसर ४ बिबटे
खंडाळा-कोंढापुरी परिसर ३ बिबटे
 

Related Articles