चंद्रभागेत बुडणार्‍या ६ जणांचे जीवरक्षकांनी वाचविले प्राण   

सोलापूर,(प्रतिनिधी) : उजनी धरण ७५ टक्केपेक्षा जास्त भरले असून, या धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. या चंद्रभागा नदीमध्ये स्नानासाठी उतरलेले भाविक खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे बुडू लागले होते. हे लक्षात येताच जीवरक्षकांनी त्यांना होडीतून बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.
 
चंद्रभागा नदीपात्रात पाणी पातळी वाढत आहे. त्यामुळे स्नानासाठी जाणार्‍या भाविकांच्या जीवाची सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने चंद्रभागा नदीमध्ये बुडणार्‍या भाविकांचे प्राण वाचविण्यासाठी कोळी समाजातील १३ तरुणांची जीवरक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या तरुणांनी रविवारी एकादशीच्या दिवशी चंद्रभागा नदीत बुडणार्‍या सहा भाविकांचे प्राण वाचविले आहेत. चंद्रभागा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करण्यात आला आहे. यामुळे नदीपात्रात मोठे मोठे खड्डे पडले आहेत. 
 
सध्या नदीला पाणी असल्यामुळे स्नानासाठी गेलेल्या भाविकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. यामुळे भाविक खड्ड्यात पडून बुडण्याची शक्यता आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी बेळगाव येथील तरुण भाविक चंद्रभागा नदीमध्ये बुडून मृत्यू पावल्याची घटना घडलेली आहे. या घटनेची जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांनी दखल घेऊन मंदिर समितीला चंद्रभागा वाळवंटामध्ये जीवन रक्षक नेमावेत, असे आदेश दिले आहेत. या आदेशाची दखल घेऊन मंदिर समितीने कोळी समाजातील १३ तरुणांची जीवन रक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. 
 
रविवारी चंद्रभागा नदीमध्ये स्नानासाठी गेलेले बाबासाहेब सोनाजी मोटे (रा. जालना), संकेत कोरे यासह इतर चार असे सहा भाविक बुडाले होते. या भाविकांना जीवन रक्षकांनी पाण्याबाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले आहेत.

एक जीव गेल्याने जीवरक्षक तैनात 

मागील चार दिवसांपूर्वी बेळगाव येथील शुभम पावले हा भाविक पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रात स्नान करण्यासाठी उतरला असता खडड्यांचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू पावला आहे. चार तासानंतर त्याचा मृतदेह सापडला. अशा घटना पुन्हा होऊ नयेत. आषाढी यात्रा काळात भाविकांची वाढती संख्या लक्षात घेवून तसेच नदीपात्रात वाढते पाणी लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने जीवरक्षक तैनात केले आहेत.
 

Related Articles