पृथ्वी शॉ भारतीय संघाबाहेर   

मुंबई : पृथ्वी शॉ हा भारतीय क्रिकेटमधील एक प्रतिभावंत क्रिकेटर आहे. कसोटी क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळीसह त्याने आपल्यातील धमक दाखवूनही दिली. पण कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे तो भारतीय संघातील स्थान गमावून बसला. एवढेच काय देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघातूनही त्याला डच्चू मिळाला. अल्पावधित मिळालेले मोठे यश आणि प्रसिद्धी बर्‍याचदा दिशा भरकटणारे ठरते. पृथ्वीच्या बाबतीतही हेच घडले. क्रिकेटवर फोकस करण्याऐवजी फिल्डबाहेरील गोष्टीत अधिक सक्रीयतेमुळे क्रिकेटरने स्वत:चे नुकसान करून घेतले. अशी चर्चा तो संघाबाहेर पडल्यापासून रंगत होती. आता खुद्द पृथ्वी शॉने ही गोष्ट  खरी असल्याचा दुजोरा दिला.  चूक कळली, आता ती मान्य करून तो पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमनासाठी कंबर कसायला तयारीत असल्याचे दिसते. 
 
पृथ्वी नेमंक काय म्हणाला त्यासंदर्भातील माहिती 25 वर्षीय पृथ्वी शॉनं एका मुलाखतीमध्ये अपयशाच्या गर्तेत सापडण्यामागची गोष्ट शेअर केली आहे. 2023 पर्यंत सगळं काही ठीक होते. मी क्रिकेटवर अधिक लक्षकेंद्रीत करायचो. दिवसातील 8 तास सराव व्हायचा. पण त्यानंतर मी काही चुकीचे निर्णय घेतले. ज्या गोष्टी गरजेच्या नव्हत्या त्याला महत्त्व दिले. परिणामी मैदानातील सराव कमी झाला. फक्त 4 तास सराव करू लागलो. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना नव्या मित्रांच्या संगत लाभली. त्यात इकडं जा तिकडं जा या गोष्टींमुळे भरकटत गेलो.  मी काय करतोय ते मला समजायला हवं होतं.  कामगिरीचा आलेख खालवण्यासाठी मी स्वत:ला जबाबदार मानतो, अशा आशयाच्या शब्दांत त्याने क्रिकेटपेक्षा इतर गोष्टीत रमल्यानं क्रिकेट कारकिर्दीवर परिणाम झाल्याचे मान्य केले.
 
माझ्या कारकिर्दीला उतरती कळा लागली तसे आयुष्यात आलेले मित्र गायब झाले. ज्यांच्यामुळं मी भरकटत गेलो ते आता माझ्या आयुष्यात नाहीत. ही गोष्ट माझ्यासाठी सकारात्मक आहे. मी मानसिकरित्या कणखर आहे. जे घडलं त्यात माझी चूक होती. मी कुणाला दोष देणार नाही. यश माझ्या जोरावर मिळवलं अन् माझ्या चुकांमुळे मला अपयशाच्या मार्गावर नेलं, असे म्हणत पृथ्वी शॉनं पुन्हा एकदा जोमानं क्रिकेटचं मैदान गाजवण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

Related Articles