अपुर्‍या चार्जिंगमुळे पीएमपी पडल्या बंद   

प्रवाशांची गैरसोय 

पुणे : प्रवाशांना सुलभ व आरामदायक प्रवास करता यावा, याकरिता पीएमपी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. तर दुसरीकडे अपुर्‍या चार्जिंगमुळे बससेवा विस्कळीत होत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी पीएमपी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. 
 
अपुर्‍या चार्जिंगमुळे पीएमपीच्या मान-हिंजवडी आगाराची प्रवासी सेवा रविवारी विस्कळीत झाली. यासह वाहतूक कोंडीमुळे बस पुर्ण क्षमतेने चार्ज होत नाहीत. त्यामुळे या बस थेट वाटेतच बंद पडत असतात. मान-हिंजवडी पीएमपीच्या आगारातून ३२ ई-बसचे संचलन होते. सकाळच्या सत्रात चार्जिंगची फारसी अडचण नसते. मात्र, दुपारच्या सत्रात अडचणी सुरू होतात. या सत्रातील आठ ते दहा बस आगारातच जास्त वेळ थांबतात. त्यामुळे त्या निर्धारित वेळेत फेर्‍या पूर्ण करू शकत नाहीत. परिणामी बसच्या काही फेर्‍या रद्द करणे पीएमपी प्रशासनाला भाग पडते. त्याचा थेट परिणाम रोजच्या प्रवाशांवर होत असतो. ई-बस सेवा पर्यावरणपुरक असली तरी चार्जिंग सुविधांतील अपुरेपणा व तांत्रिक अडचणीमुळे पीएमपीला नियमित सेवा पुरविण्यात अडचणी येत असतात. 

प्रवाशांना फटका 

माण - हिंजवडी आगारात ई-बस पुर्ण क्षमतेने चार्जिंग होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या आगारातील काही बस मार्गावरच बंद पडत आहेत. अनेकदा प्रवाशांना बसची वाट पाहत थांबावे लागते. अथवा खचाखच भरलेल्या बसमधून त्यांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांना त्याचा फटका बसत चालला आहे. 
 

Related Articles