मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली : उद्धव   

मुंबई,(प्रतिनिधी) : मराठीच्या मुद्द्यावर मराठी माणूस एकत्र येत होता. ५ तारखेला त्याचे प्रतिबिंब दिसणार होते. पण मराठी माणसाची एकजूट होउ नये, अशीच या सरकारची भूमिका आहे. त्यामुळेच हिंदीसक्तीचा निर्णय मागे घेतला आहे. आपल्या काळात निर्णय झाल्याचा दावा पूर्णतः खोटा आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 
 
माशेलकर समितीचा अहवाल मुख्यमंत्री असताना माझ्यासमोर कधीच आला नाही, मी कधी तो उघडूनही बघितला नाही. भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे, असे टिकास्त्र देखील उद्धव  यांनी सोडले. मी जर तो जीआर काढला होता तर हे तीन वर्षे काय झोपा काढत होते का? असा सवालही त्यांनी केला.
सरकारने हिंदीचे जीआर रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर मातोश्री येथे पत्रकार परिषद घेऊन उद्धव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली. मराठी माणूस एकवटल्यावर काय होते हे दिसून आले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी देखील असेच झाले होते, असे सांगून उद्धव म्हणाले, मराठी माणूस एकवटू नये यासाठीच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. पण एकत्र येण्यासाठी संकट येण्याची वाट मराठी माणसाने का बघायची. आम्ही एकवटतोय हे पाहूनच हे संकट मागे गेले. त्यामुळे आता ५ तारखेला आम्ही सगळे एकत्र येणार आहोत. तो जल्लोषाचा मोर्चा असेल! आता मोर्चा काढायचा की सभा घ्यायची हे आम्ही सगळे मिळून ठरवू असे उद्धव ठाकरे म्हणाले.
 

Related Articles