वाघोलीकरांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न   

वाको वेल्फेअर असोसिएशनचा आरोप 

पुणे : निवडणुकीत नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी राज्य शासन व निवडणूक आयोगाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असतात. मात्र, यांच्याकडून वाघोलीतील शेकडो मतदारांचे अर्ज रितसर नाकारले जात आहे. हा लोकशाही व्यवस्थेवरील घातक आघात आहे. वाघोलीतील मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप वाको वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल कुमार मिश्रा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
 
गेल्या चार ते पाच महिन्यांपासून वाघोलीतील बहुसंख्य नागरिकांनी फॉर्म 6 व 8 भरून नवीन नोंदणीसाठी रितसर अर्ज केला आहे. मात्र, कुठलेही कारण न देता अर्ज शिरूर तहसिल कार्यालयात हजेरीसाठी पाठवले जात आहेत. महत्वाचे म्हणजे, अत्यंत कमी वेळेत ज्येष्ठ नागरिक व नोकरदार हे हजेरीसाठी कार्यालयात उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे अनेकांचे अर्ज फेटाळले जात आहेत. येथील स्थानिक नागरिक शासनाचे विविध करही भरत आहेत. असे असूनही त्यांच्यावर अन्याय का? असा सवालही मिश्रा यांनी उपस्थित केला आहे. कायदेशीररित्या दाखल केलेल्या अर्जाच्या सुनावणीसाठी 50 किलोमीटर अंतरावर बोलावणे, म्हणजे संविधानाचे उल्लघंन आहे. अर्जाची पडताळणी प्रक्रिया वाघोली जवळच राबवायला पाहिजे आहे, असेही त्यांनी सांगितले. 
 
नागरिकांचा इशारा 
 
या प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. वाघोलीतील बहुसंख्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व अस्वस्था पसरली आहे. हा प्रकार तत्काळ थांबवायला हवा. अन्यथा यापुढे राज्य शासन व निवडणूक आयोगाला संतप्त नागरिकांच्या रोशाला समोरे जावे लागेल, अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला.  

Related Articles