भारतीय संघ मजबूत स्थितीत   

केएल राहुल आणि रिषभ पंतची शतकी खेळी

हेडिंग्ले : भारतीय संघाने दुसर्‍या सत्रात शानदार कामगिरी केली आणि इंग्लंडला फक्त एकच यश मिळवून दिले. भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्समध्ये खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी चहापानापर्यंत भारतीय संघाने दुसर्‍या डावात चार विकेटवर २९८ धावा केल्या आहेत आणि त्यांची एकूण आघाडी ३०४ धावांपर्यंत वाढली आहे. केएल राहुल सध्या १२० धावांसह आणि करुण नायर ४ धावांसह खेळत आहे. दुसर्‍या सत्रात ऋषभ पंतच्या रूपात भारताने एक विकेट गमावली. पंत बाद झाला असेल, पण त्याने केएल राहुलसोबत चौथ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी केली. पहिल्या डावानंतर दुसर्‍या डावात पंतने शतक झळकावले, ज्यामुळे भारत मोठा धावसंख्या गाठण्यात यशस्वी झाला.

केएल राहुलचे शतक 

भारतीय संघ अडचणीत असताना केएल राहुल पुन्हा एकदा भारतीय संघाच्या मदतीला धावून आला आहे. पहिल्या डावात ६ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाला चांगल्या सुरूवातीची गरज होती. पण यशस्वी जैस्वाल स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर केएल राहुलने एक बाजू धरून ठेवली आणि दमदार शतक झळकावले आहे. या शतकी खेळीसह केएल राहुलने सुनील गावस्कर आणि केएल राहुल सारख्या दिग्गज खेळाडूंचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
 
एल राहुल हा वर्तमान कसोटी भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाला एक असा फलंदाज हवा होता जो एक बाजू धरून ठेवेल. केएल राहुलने या सामन्यातील पहिल्या डावातही भारतीय संघाला चांगली सुरूवात करून दिली होती. मात्र, ४२ धावा करून त्याला माघारी परतावे लागले. चांगल्या सुरुवातीचा जैस्वाल, गिल आणि ऋषभ पंतने चांगला फायदा घेतला. या डावात गिल आणि जैस्वाल स्वस्तात माघारी परतले. पण केएल राहुल खंबीरपणे उभा राहिला आणि आपले शतक पूर्ण केले.
 
हे केएल राहुलचं कसोटी क्रिकेटमधील ९ वे शतक ठरले आहे. तर इंग्लंडमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून ३ शतके झळकावणारा तो पहिलाच भारतीय सलामीवीर फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने सुनील गावस्कर, राहुल द्रविड, विजय मर्चंट आणि रवी शास्त्री या दिग्गज खेळाडूंचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. या दिग्गजांच्या नावे इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून २ शतके झळकावण्याची नोंद आहे.

राहुलची कसोटी कारकीर्द  

राहुलने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाविरुद्ध त्याच्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने ५९ सामन्यांच्या १०३ डावांमध्ये सुमारे ३५ च्या सरासरीने ३,३०० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने ९ शतके आणि १७ अर्धशतके देखील ठोकली आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी १९९ धावा आहे. त्याने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत ७,५०० हून अधिक धावा केल्या आहेत. 

ऋषभ पंतची ऐतिहासिक कामगिरी

भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने लीड्स कसोटीत पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात १३४ धावांचे शानदार शतक झळकावल्यानंतर, पंतने दुसर्‍या डावातही १०० धावांचा टप्पा गाठून एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पंतने केएल राहुलसह मोठी भागीदारी रचत भारताला ३०० धावांच्या आघाडीजवळ पोहोचवले आहे.
 
पंतचे हे कसोटी क्रिकेटमधील ८ वे शतक आहे. विशेष म्हणजे त्याने यापैकी ६ शतके भारताबाहेर झळकावली आहेत. तर, इंग्लंडविरुद्ध ही त्याची ५वी शतकी खेळी आहे. इंग्लंडमध्ये खेळताना त्याने यापैकी ४ शतके झळकावली आहेत. पंतच्या शतकामुळे तो विदेशी भूमीवर सर्वाधिक कसोटी शतके झळकावणार्‍या यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीत तिसर्‍या स्थानावर पोहोचला आहे.
 
शतक झळकावल्यानंतर पंत काही मोठे फटके खेळल्यानंतर बाद झाला. त्याने १४० चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकारांसह ११८ धावांची वादळी खेळी केली. यासह त्याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एक दुर्मिळ विक्रम आपल्या नावे केला आहे.
 
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दोन्ही डावात शतक झळकावणारा पंत फक्त जगातील दुसरा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी एका कसोटीत यष्टीरक्षक म्हणून दोन शतके करण्याचा विक्रम अँडी फ्लॉवर यांच्या नावावर आहे. अँडी फ्लॉवर यांनी २००१ मध्ये हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ही कामगिरी केली होती. अँडी फ्लॉवर यांनी पहिल्या डावात १४२ धावा आणि दुसर्‍या डावात त्यांनी १९९ धावांची खेळी करत ही कामगिरी आपल्या नावे केली होती. ऋषभ पंतने आता अँडी फ्लॉवर यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

दोन्ही डावात शतक झळकावणारा भारताचा सातवा खेळाडू

विजय हजारे
सुनील गावस्कर
राहुल द्रविड
विराट कोहली
अजिंक्य रहाणे
रोहित शर्मा
 

Related Articles