पन्नास टक्के महिलांकडे नाही स्वतःचा मोबाइल   

वृत्तवेध 

ग्रामीण भागातील महिला मोबाईल आणि इंटरनेट वापरत आहेत; परंतु सुमारे पन्नास टक्के महिलांकडे स्वतःचा मोबाईल फोन नाही. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने अलीकडेच ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह मॉड्यूलर सर्व्हे: टेलिकम्युनिकेशन, २०२५ (सीएमएस-टी)चा डेटा जारी केला आहे. त्यात जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यानचा डेटा समाविष्ट आहे. या डाटानुसार ग्रामीण भागातील १५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील ७६.३ टक्के महिला मोबाईल फोन वापरतात; परंतु ४८.४ टक्के महिलांकडे स्वतःचा फोन नाही. त्याच वेळी ग्रामीण भागातील १५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील ८९.५ टक्के पुरुष मोबाईल फोन वापरतात आणि ८०.७ टक्के पुरुषांकडे मोबाईल फोन आहेत.
 
या आकडेवारीवरून दिसून येते की महिला आणि पुरुषांमध्ये मोबाईल मालकीच्या बाबतीत सुमारे ३२ टक्के फरक आहे. शहरी भागांमधील १५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील ७१.८ टक्के महिलांकडे मोबाईल फोन आहे, तर या श्रेणीतील ९० टक्के पुरुषांकडे मोबाईल आहे. शहरांमध्ये ९५ टक्के पुरुष मोबाईल फोन वापरतात तर ८६.८ टक्के महिला फोन वापरतात. ग्रामीण भागातील महिला मोबाईल आणि इंटरनेट वापरत आहेत; परंतु त्यापैकी सुमारे निम्म्या लोकांकडे मोबाईल फोन नाही. ग्रामीण भागात,१५ ते २४ वयोगटातील ९५.७ टक्के महिला फोन वापरतात; परंतु फक्त ५१.७ टक्के लोकांकडे मोबाईल फोन आहे. त्याच वेळी या वयोगटातील ९८ टक्के पुरुष फोन वापरतात तर ७४.८ टक्के लोकांकडे मोबाईल आहे. शहरांमध्ये, १५ ते २४ वयोगटातील ६९.५ टक्के महिलांकडे फोन आहे तर ८२.७ टक्के पुरुषांकडे मोबाईल आहे. ग्रामीण भागात १५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील फक्त ५७.६ टक्के महिला इंटरनेट वापरतात तर शहरांमध्ये ही संख्या ७४ टक्के आहे. ग्रामीण भागात, या वयोगटातील ७२.१ टक्के पुरुष इंटरनेट वापरतात तर शहरांमध्ये ही संख्या ८५.५ टक्के आहे.

Related Articles