शक्तिप्रदर्शनासाठी जोरदार मोर्चेबांधणी...   

मनसे, उद्धव सेनेच्या बैठका 

मुंबई, (प्रतिनिधी) : पहिलीपासून अभ्यासक्रमात हिंदी भाषेचा समावेश करण्याच्या सरकारच्या निर्णयाला जोरदार विरोध करण्यासाठी ५ जुलै रोजी उद्धव व राज ठाकरे एकत्र येऊन मोर्चा काढणार असल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर तब्बल १९ वर्षांनी  राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षात प्रचंड उत्साह असून या मोर्चात ‘ठाकरे ब्रँड’ची ताकद दाखवण्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबईसाठी मराठी शक्तींनी एकत्र यावे, अशी जनभावना असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले.
 
५ जुलै रोजी सरकारच्या विरोधात काढण्यात येणार्‍या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा बॅनर असणार नाही. पण, या निमित्ताने आपली शक्ती दाखवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न असणार आहे. ठाकरे गटाचे खासदार राऊत यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दोन भाऊ एकत्र येत असल्याने प्रचंड उत्साह असल्याचे सांगितले. आपले शरद पवार यांच्यासोबत देखील बोलणे झाले आहे. त्यांच्या पक्षाने देखील मोर्चाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेस देखील हिंदी सक्तीच्याविरोधात आहे. काँग्रेसदेखील या मोर्चात सहभागी होईल. तसेच, अनेक छोटे पक्ष देखील मोर्चात सहभागी होतील, असे राऊत यांनी सांगितले.
 
ठाकरे बंधू मराठी, तर मी काय पंजाबी आहे का? : फडणवीस यांचा सवाल
 
सरकारने हिंदीची सक्ती केलेलीच नाही. तो ऐच्छिक विषय आहे. पण, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकारण सुरू आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक नसती तर हा विषय असा पुढे आलाही नसता, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लगावला. ठाकरे बंधू मराठी आहेत, तर मी काय पंजाबी किंवा गुजराथी आहे का? असा उपरोधिक सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. मराठी मतांच्या एकत्रीकरणाबाबत विचारले असता, मी पण मराठीच आहे. माझ्या पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार आहेत. ते कुठे आंध्र प्रदेश किंवा गुजरातहून आले आहेत का?, असे फडणवीस म्हणाले. 

Related Articles