पावसामुळे भीमाशंकर परिसर निसर्ग सौंदर्याने नटला   

मंचर,(प्रतिनिधी) : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस झाल्याने या पावसामुळे भीमाशंकर परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला असून ओढेनाले खळाळु लागले. सर्वत्र हिरवाई पसरली असून अनेक ठिकाणी धबधबे सुरु झाल्याने पर्यटकांची पावले या ठिकाणी वळु लागली आहेत. 
 
मागील काही दिवसांपासून आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पाऊस झाला.या पावसामुळे परिसर हिरवाईने नटला आहे. तसेच ओढे, नाले ही खळाळून वाहत आहे. वातावरणातील गारवा, धुके यामुळे या परिसरात पर्यटक येऊ लागले आहे. कमी गर्दीचा परिसर व निसर्गाची मुक्त हस्ताने होणारी उधळण यामुळे पश्चिम भागात पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पर्यटनाबरोबरच भीमाशंकर देवस्थानचे दर्शनही होत असल्याने पर्यटन आणि तीर्थाटन एकाच वेळी होत असल्याने या ठिकाणी भाविक भक्त पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. भीमाशंकर मंदिर, कोकणकडा, नागफणी, भीमाशंकरचे वैशिष्ट्य असणारे शेकरू तसेच इतर वन्य प्राणी पक्षी, कोंढवळ धबधबा, डिंभे धरण, पाणलोट क्षेत्र अशा अनेक ठिकाणांबरोबरच माळीण या ठिकाणीही पर्यटक जाऊ लागले आहेत. त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. त्याच प्रमाणे आहुपे परिसरातील कोकणकडे धबधबे येथेही पर्यटन मोठ्या संख्येने येत असल्याचे पहावयास मिळत आहे. 
 
सध्या निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. मोठ्या प्रतीक्षेनंतर पर्यटकमोठ्या प्रमाणात फिरताना पहावयास मिळत आहे. परंतु फिरत असताना पर्यटकांनी निसर्गाची हानी होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. सध्या निसरडे झालेले रस्ते जंगलातून जात असताना वन्य प्राण्यांपासून सावध राहिले पाहिजे. शांतता राखली पाहिजे. तसेच धबधब्यामध्ये उतरताना काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून आपण निसर्गाची काळजी घेतली तर निसर्ग आपली काळजी घेईल. सध्या तरी आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भाग पर्यटकांना खुलवत असून पर्यटकांची पावले या ठिकाणी वळू लागल्याचे दिसून येत आहे.
 

Related Articles