गुजरातची जनता भाजपला कंटाळली   

विसावदर मतदारसंघ जिंकल्यानंतर केजरीवाल यांची पोस्ट!

नवी दिल्ली : या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार गोपाल इटालिया यांनी जुनागढ जिल्ह्यातील विसावदर मतदारसंघातून विजय मिळवला.  त्यांनी भाजप उमेदवार किरीट पटेल यांचा पराभव केला. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये विसावदर मतदारसंघात 'आप'ने त्यांचे वर्चस्व कायम ठेवले. या विजयानंतर आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपला टोला लगावला. गुजरातमधील जनता आता भाजपला कंटाळली आहे, असे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले.
 
अरविंद केजरीवाल यांनी आपल्या अधिकृत 'एक्स' हँडलवरून केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, "गुजरातमधील विसावदर मतदारसंघ आणि पंजाबमधील लुधियाना पश्चिम मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या दमदार विजयाबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. गुजरात आणि पंजाबमधील जनतेचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार. दोन्ही ठिकाणी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत विजयाचे अंतर जवळजवळ दुप्पट झाले आहे. यावरून असे दिसते की, पंजाबमधील जनता आमच्या सरकारच्या कामावर खूप खूश आहे. त्यांनी आम्हाला २०२२ पेक्षा जास्त मतदान केले. गुजरातमधील जनता आता भाजपला कंटाळली आहे आणि त्यांना आम आदमी पक्षाकडून अपेक्षा आहे. दोन्ही ठिकाणी काँग्रेस आणि भाजप दोघांनीही एकत्र निवडणुका लढवल्या. दोघांचेही उद्दिष्ट आप पक्षाला हरवण्याचे होते. पण लोकांनी दोन्ही ठिकाणी या दोन्ही पक्षांना नाकारले."
 
डिसेंबर २०२३ मध्ये भूपेंद्र भयानी यांनी राजीनामा देऊन सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून विसावदर मतदारसंघातील जागा रिक्त होती.  १९ जून रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत विसावदर मतदारसंघात ५६.८९ टक्के मतदान झाले. तर, आज निकाल जाहीर झाला. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, गोपाल इटालिया यांना ७५ हजार ९४२ मते मिळाली. तर, त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे उमेदवार किरीट पटेल यांना ५८ हजार ३८८ मते मिळाली. अशाप्रकारे, गोपाल इटालिया यांनी किरीट पटेल यांचा १७ हजार ५५४ मतांनी पराभव केला.
 

Related Articles