टिमवितर्फे मोफत फिजिओथेरपी उपचार शिबिर   

वारकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २४७ भाविकांनी घेतला लाभ

पुणे : विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक मैल चालत जाणार्‍या वारकर्‍यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंदूताई टिळक कॉलेज ऑफ फिजिओथेरपी विभागाच्या वतीने मोफत भौतिकोपचार (फिजिओथेरपी) सेवा शिबिर राबविण्यात आले. या शिबिराला वारकर्‍यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भवानी पेठेतील सुर्यमुखी मारूती मंदिर परिसरात पथक क्र. ६ मधील २४७ वारकर्‍यांनी शिबिरात उपचार घेतले.
 
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबवण्यात आला. शिबिरात स्नायू व सांधेदुखी, पायातील वेदना, थकवा, ताण आणि इतर शारीरिक तक्रारींवर उपचार करण्यात आले.शिबिराला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख डॉ. मानसिंग साबळे यांनी भेट दिली. यावेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, इंदूताई टिळक कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. महेंद्र शेंडे, प्रा. डॉ. रिमा मुसळे उपस्थित होते.
 
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी फिजिओथेरपी विभागातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. वारकर्‍यांची सेवा हीच खरी सेवा मानत दरवर्षीप्रमाणे यंदाही टिमविने सामाजिक बांधिलकी जपत उपक्रम राबविला.

Related Articles