पाकिस्तानात आत्मघातकी हल्ल्यात १६ सैनिक ठार   

२० हून अधिक जखमी 

पेशावर : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात शनिवारी एका आत्मघातकी हल्ल्यात १६ सैनिक ठार तर २० हून अधिक जण जखमी झाले,  अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यातील खाडी परिसरात काल सकाळी एका आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन एका वाहनावर धडकवले. यात १६ सैनिक ठार झाले. तर, २० हून अधिक जखमी झाले. यामध्ये महिला आणि मुलांसह १४ नागरिकांचा समावेश आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, असेही ते म्हणाले.
 
विशेष म्हणजे, या भागात संचारबंदी लागू असताना ही घटना घडली, असे सूत्रांनी सांगितले. स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. या हल्ल्याची जबाबदारी हाफिज गुल बहादूर गटाचा एक उप-गट असलेल्या उसुद अल-हरब या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे. उत्तर वझिरीस्तानमधील ही घटना मागील काही महिन्यांतील सर्वांत मोठी घटना मानली जात आहे. 

Related Articles