मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात   

टँकर थेट खाडीत बुडाला, चालकाचा मृत्यू

मुंबई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वर्सोवा पुलावर टँकर खाडीत कोसळल्याने भीषण अपघात घडलाय. टॅंकरने लाकडाने भरलेल्या ट्रेलरला मागून जोरदार धडक दिल्यानंतर स्टेअरिंग वळवताना टॅंकर लोखंडी ग्रीलच्या कठड्याला धडकला आणि कठडा तोडून टँकर थेट खाडीत कोसळला. या घटनेचे धक्कादायक व्हिडीओ आणि फोटो समाज माध्यमांत येत आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर येथील जुन्या वर्सोवा पूलावर सोमवारी बाराच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे.
 
टॅंकर पूर्णपणे खाडीच्या पाण्यात बुडाल्याने चालकाचा मृत्यू झाला आहे. टॅंकर ठाण्याकडे जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून राष्ट्रीय महामार्गावर गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गीकेवर नायगाव आणि भाईंदरला जोडणाऱ्या जुन्या वर्सोवा पुलावर हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून टँकर मात्र खाडीच्या पात्रात बुडाला आहे.
 
आज सकाळी पाण्याच्या टँकरवरील नियंत्रण सुटल्याने तो वर्सोवा खाडीत (भाईंदर खाडी) पडला. टँकर ठाण्याकडे जात असताना रेलिंग तोडून तो खाडीत पडला, असे काशीगाव पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी सांगितले. चालकाकडे कोणतेही ओळखपत्र आढळले नाही, त्यामुळे त्याची ओळख पटू शकली नाही आणि टँकर खाडीत असल्याने अद्याप नंबर प्लेट सापडलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे आणि या अपघाताचे कारण तपासत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.
 
मिळालेली अधिक माहिती अशी की, टॅंकरने लाकडाने भरलेल्या ट्रेलरला मागून जोरदार धडक दिली. त्यानंतर स्टेअरिंग वळवतानाच टॅंकर थेट खाडीत कोसळला. टॅंकर खाडीत कोसळल्याचे कळताच लोकांनी मोठ्या संख्येने धाव घेतली. काही वेळातच खाडीत टॅंकर बुडाला. चालकाला वाचवण्यासाठी लोकांनी प्रयत्न केली. मात्र, त्याला वाचवण्यात यश आले नाही. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी अपघातानंतर लोखंडी जाळी तुटली आहे. यामुळे खबरदारी घेतली जात आहे. हे टॅंकर ठाण्याच्या दिशेने जात होते.

Related Articles