गगनयान मोहिमेच्या दिशेने पहिले पाऊल...   

मोदी यांचा शुभांशू यांच्याशी संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अवकाशवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधला. शुभांशू यांचा अंतराळ प्रवास हा भारताच्या गगनयान मोहिमेच्या दिशेने पहिले पाऊल आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. लखनौमध्ये जन्मलेल्या अवकाशवीराचा हा ऐतिहासिक प्रवास केवळ अवकाशापुरता मर्यादित नसून तो ‘विकसीत भारता’च्या वाटचालीला नवीन गती देणारा आहे, असेही मोदी यांनी सांगितले.
 
शुभांशू यांनी हा माझा वैयक्तिक पराक्रम नव्हे तर संपूर्ण देशाचा सामूहिक पराक्रम आहे, असे सांगितले. मी पहिल्यांदाच अंतराळातून भारत पाहिला. तेव्हा तो नकाशापेक्षा खूपच मोठा आणि भव्य वाटला, असेही शुभांशू म्हणाले.शुभांशू हे अमेरिकेच्या अनुभवी अंतराळवीर मिशन कमांडर पेगी व्हिटसन, पोलंडचे स्लावोस उझनान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू यांच्यासमवेत सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आहेत. ते १४ दिवस अंतराळ स्थानकात राहणार असून तेथील प्रयोगशाळेत विज्ञान, शिक्षण आणि व्यावसायिक असे ६० प्रयोग करणार आहेत.
 
शुभांशू हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय अवकाशवीर ठरले आहेत. मोदी यांनी काल शुभांशू यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान कार्यालयाने या  संवादाची चित्रफित प्रसिद्ध केली आहे. शुभांशू आज तुम्ही भारतीय भूमीपासून दूर आहात. पण, भारतीयांच्या सर्वात जवळ असल्याचे मोदी म्हणाले. यावेळी शुभांशू यांनी पृथ्वीवर कोणत्याही सीमा नाहीत, आपण सर्व एक आहोत, असे सांगितले.
 
भारताच्या गगनयान मोहिमेच्या यशाचा हा पहिला अध्याय आहे. तुमचा हा ऐतिहासिक प्रवास केवळ अवकाशापुरता मर्यादित नाही, तर तो विकसित भारताच्या आपल्या प्रवासाला गती आणि नवीन बळ देईल. भारत आता जगासाठी अवकाशातील नवीन उपक्रमांसाठी दरवाजे उघडणार आहे. आता भारत केवळ उड्डाण करणार नाही, तर भविष्यात नवीन उड्डाणांसाठी व्यासपीठ तयार करेल, असे मोदी यावेळी म्हणाले.

Related Articles