युद्ध करून भारताच्या सहा नद्या मिळवू : बिलावल   

इस्लामाबाद : भारताने सिंधू जल करारावरील स्थगिती उठवली नाही, तर पाकिस्तान युद्ध करून सर्व सहा नद्या ताब्यात घेईल, अशी गरळ पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी ओकली.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांना जबाबदार धरत १९६० चा सिंधू जल करार स्थगित केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या करारावरील स्थगिती भारत उठवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 
सिंधू जल करार कधीही पूर्ववत होणार नाही. उलट पूर्वी पाकिस्तानात जाणारे पाणी नवीन कालव्याच्या पायाभूत सुविधांद्वारे राजस्तानसारख्या भारतीय राज्यांकडे वळवले जाईल, असे शहा यांनी म्हटले आहे. शहा यांच्या विधानानंतर पाकिस्तानमध्ये युद्धाची चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताला इशारा दिला आहे. 
 
बिलावल भुट्टो म्हणाले, सिंधू जल करारावरील स्थगिती भारताला उठवावीच लागेल. भारताकडे दोनच पर्याय आहेत, सिंधू जल कराराला सहमती देणे  अन्यथा पाकिस्तानसोबतच्या युद्धाला सामोरे जाणे. कारण आम्हीच सिंधू संस्कृतीचे खरे संरक्षक आहोत आणि आम्ही त्याचे रक्षण करू. या करारावरील स्थगिती उठवली नाही, तर पाकिस्तान युद्ध करून सर्व सहा नद्या ताब्यात घेईल.भारताविरुद्ध त्यांनी असे विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी म्हटले होते की, एकतर सिंधू नदीत पाणी वाहेल किंवा त्यांचे रक्त वाहेल. सिंधू नदी आमची आहे आणि आमचीच राहील. पाकिस्तानचा पाणीपुरवठा खंडित केल्याने युद्धाशिवाय पर्याय राहणार नाही यावर भर देऊन भुट्टो यांनी आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
 

Related Articles