कर्मचारी वेळापत्रकात त्रुटी; एअर इंडियाच्या तीन अधिकार्‍यांवर कारवाई   

मुंबई : विमानातील कर्मचार्‍यांच्या कामाच्या वेळापत्रकात गंभीर त्रुटी आढळून आल्या असून, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने याची दखल घेत हे काम एअर इंडियाच्या तीन अधिकार्‍यांकडून त्वरित काढून घेण्याचे आदेश दिले आहे. तसेच तिघांविरोधात त्वरित शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यास सांगितले आहे. 
 
नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने म्हटले आहे की, लायसन्सिंग, विश्रांतीच्या वेळा तसेच उड्डाणाच्या अनुभवासंदतील निकष या गोष्टींबाबत कर्मचारीवर्गाच्या कामाच्या वेळापत्रकात गंभीर त्रुटी आढळल्या. उड्डाणाचे व्यवस्थापन, कर्मचार्‍यांचे वेळापत्रक अशा गोष्टींवर एअर रुट मॅनेजमेंट सिस्टीम  या सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे लक्ष ठेवण्यात येते. त्यातूनच या त्रुटी लक्षात आल्या. 
 
त्यामुळे संबंधित तीन अधिकार्‍यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये या कंपनीच्या एका विभागीय उपाध्यक्षाचाही समावेश आहे. विमान कर्मचार्‍यांच्या कामाचे वेळापत्रक तयार करण्याबद्दलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी डीजीसीएने एअर इंडियाला यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. 
 
दरम्यान, एअर इंडियाने डीजीसीएच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली असून, चीफ ऑपरेशन्स ऑफिसरच्या देखरेखीखाली इंटिग्रेटेड ऑपरेशन्स कंट्रोल सेंटरचे कामकाज चालणार आहे.
 

Related Articles