आदिवासी उलगुलान वेध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सबनीस   

पुणे : आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्था, बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर आणि विदिशा विचार मंच, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आठवे आदिवासी उलगुलान वेध साहित्य संमेलन येत्या सोमवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेत आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी यांनी दिली. 
 
सकाळी 8.30 वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. या संमेलनाच्या प्रवेशद्वारास बिरसा मुंडा प्रवेशद्वार असे नाव, तर व्यासपीठाला क्रांतिवीर राघोजी भांगरा साहित्य मंच असे नाव देण्यात येणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष  कृष्णकुमार गोयल असून संमेलनाचे उद्घाटन सकाळी 10.30 वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. 
 
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विनायक तुमराम, माजी संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध लेखक विश्वास वसेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी 12.30 वाजता प्रा. विश्वास वसेकर, रामराजे अत्राम, प्रा. तुलसीदास भोयर हे आदिवासी साहित्याचे अभिवाचन करणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 वाजता परिसंवाद होणार आहे. त्यात डॉ. हंसराज जाधव, प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे, प्रा. डॉ. कृष्णा भवारी, प्रा. डॉ. ज्ञानेश्‍वर वाल्हेकर सहभागी होणार आहेत. या संमेलनाचा समारोप दुपारी 4.30 वाजता कवी संमेलनाने होणार आहे. 

Related Articles