असवानी डेअरडेव्हिल्स् संघाला विजेतेपद   

पुणे : पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट संघटने तर्फे आयोजित आणि ऑक्सिरीच पुरस्कृत ‘पिंपरी चिंचवड प्रीमीअर लीग’ २०२५ (पीसीपीएल) टेव्न्टी-२० क्रिकेट स्पर्धेत गणेश अंकुशे याने फटकावलेल्या नाबाद ५९ धावांच्या जोरावर असवानी डेअरडेव्हिल्स् संघाने छत्रपती संभाजी किंग्ज् संघाचा ४ गडी राखून पराभव करून विजेतेपद संपादन केले.
 
 हिंजेवाडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना छत्रपती संभाजी किंग्ज् संघाने २० षटकामध्ये १४५ धावांचे लक्ष्य उभे केले. साईश शिंदे याने ५६ धावांची आणि विशाल गव्हाणे याने ४५ धावांची खेळी करून संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. हे आव्हान असवानी डेअरडेव्हिल्स् संघाने १९.२ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले. गणेश अंकुशे याने ४९ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५९ धावांची खेळी केली. रूद्र पटेल याने २४ धावा, मनोज राऊत याने १९ धावा, शहाबाज सय्यद याने १८ धावा करून संघाचा विजय साकार केला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मा. खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट संघटनेचे कार्यध्यक्ष रोहिदास कोंडे, अध्यक्ष जगदीश शेट्टी, सचिव राजु कोतवाल, उपसचिव डॉ. दिलीपसिंह मोहिते, उद्योजक श्रीचंद आसवानी, विजय आसवानी, माणिकचंद ऑक्सिरीचचे राजेश पवार आदि मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या असवानी डेअरडेव्हिल्स् संघाला १ लाख ५० हजार रूपये आणि करंडक तर, उपविजेत्या छत्रपती संभाजी किंग्ज् संघाला ७५ हजार रूपये आणि करंडक असे पारितोषिक देण्यात आले. तृतीय क्रमांक मिळवलेल्या बारणे स्पोटर्स अ‍ॅकॅडमीला ५० हजार रूपये आणि करंडक तर, चौथ्या क्रमांक मिळवलेल्या विश्वा टायगर्स संघाला ५० हजार रूपये आणि करंडक असे पारितोषिक देण्यात आले. मोरे पाटील पॅटर्न संघाला सर्वोत्कृष्ट शिस्तबद्ध संघ असे पारितोषिक देण्यात आले.
 
अंतिम सामन्याचा संक्षिप्त निकालः छत्रपती संभाजी किंग्ज्ः २० षटकात ५ गडी बाद १४५ धावा (साईश शिंदे ५६ (५१, ६ चौकार, १ षटकार), विशाल गव्हाणे ४५ (३२, ४ चौकार, २ षटकार), गणेश कलेल १-१९, शहाबाज सय्यद १-११) पराभूत वि. असवानी डेअरडेव्हिल्स्ः १९.२ षटकात ६ गडी बाद १४९ धावा (गणेश अंकुशे नाबाद ५९ (४९, ५ चौकार, २ षटकार), रूद्र पटेल २४, मनोज राऊत १९, शहाबाज सय्यद १८, करण जाधव ३-२१, कृष्णा चौधरी १-९); सामनावीरः गणेश अंकुशे;
 
वैयक्तिक पारितोषिकः
 
स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः साईश शिंदे (१५६ धावा, ६ विकेट, छत्रपती संभाजी किंग्ज्);सर्वोत्कृष्ट फलंदाजः हर्षल हाडके (२२७ धावा, विश्वा टायगर्स); सर्वोत्कृष्ट गोलंदाजः जीत भारती (१३ विकेट, बारणे स्पोटर्स अ‍ॅकॅडमी); सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकः आदित्य एकशिंदे (९ बाद, विश्वा टायगर्स);

Related Articles