ठाकरे बंधूंमधील संवाद बघून काही जण अस्वस्थ   

महायुतीच्या नेत्यांना राऊत यांचा टोला

मुंबई, (प्रतिनिधी) : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाचा धसका घेऊन सरकारने त्रिभाषा सूत्राचा आदेश रद्द केला. आता मोर्चा ऐवजी जल्लोष मेळावा होणार आहे. हे दोघे एकत्र येत असल्याने अनेक डोमकावळे अस्वस्थ होऊन कावकाव करत आहेत, असा टोला ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी लगावला. ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने महाराष्ट्राचे लक्ष या मोर्चाकडे लागले होते. मराठी माणसाची ताकद दिसणार होती. महाराष्ट्रात मराठी ताकदीचा विजय होणार होता. पण, दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ झाले होते, सत्ताधारी वैफल्यग्रस्त होते. महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार होता, म्हणून हा त्रिभाषा आदेश मागे घेतला, अशी टीका राऊत यांनी केली. फडणवीस हे केवळ अफवा पसरवत नाहीत, तर ते भाजपच्या राष्ट्रीय धोरणानुसार खोटे बोलतात. जसे नरेंद्र मोदी आणि अमित शहा खोटे बोलतात. अशा विषयात कोणाचा तरी सल्ला घेणे आवश्यक असते, त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या काळात रघुनाथ माशेलकर यांची समिती स्थापन केली होती, असे सांगितले.
 

Related Articles