मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया   

परामर्श,डॉ.दीपक बोरगावे 

केनियाचे जगप्रसिद्ध लेखक न्गुगी वा थियांगो (१९३८-२०२५) यांचे अलीकडेच निधन झाले. आधुनिक आफ्रिकन साहित्याचे जनक चिनुया अचेबीनंतर न्गुगी वा थियांगो यांचेच नाव घेतले जाते. त्यांनी कादंबरी, नाटक, लघुकथा, निबंधलेखन याचबरोबर साहित्यिक आणि सामाजिक समीक्षा आणि लहान मुलांसाठीही लेखन केले. साहित्यासाठी दिली जाणारी बरीच आंतरराष्ट्रीय पारितोषिके त्यांना मिळाली आहेत. साहित्याच्या नोबेल पारितोषिकासाठी प्रत्येक वर्षी त्यांचे नाव विचारार्थ होते. यावरून त्यांच्या साहित्याची महती लक्षात यावी. ‘व्हाय ह्यूमन्स वॉक अपराईट’ ही त्यांची कथा जगातल्या ९० भाषांमध्ये अनुवादित झाली आहे.
 
आफ्रिकन रायटर्स सीरिजमधील वीप नॉट, चाइल्ड (१९६४) ही त्यांची पहिली कादंबरी. न्गुगीनी आपल्या पहिल्या कादंबर्‍या मुळातून इंग्रजीतून लिहिल्या; पण नंतर त्यांनी ’गिकुयी’ आणि ’स्वाहिली’ या केनियन भाषेतून लेखन केले. त्यांच्या एका वादग्रस्त नाटकामुळे तत्कालीन केनियन शासनाने त्यांना अटक केली आणि एक वर्ष त्यांना तुरुंगवासात डांबले. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर न्गुगींनी अमेरिकेतील येल आणि न्यूयॉर्क विद्यापीठांत अध्यापन केले. द् रिव्हर बिटवीन (१९६५), अ ग्रेन ऑफ व्हिट (१९६७), पेटल्स ऑफ ब्लड (१९७७), डेव्हिल ऑन द क्रॉस (१९८०), मातीगारी या त्यांच्या काही गाजलेल्या कादंबर्‍या. मातीगारी  ही कादंबरी मराठीत अनुवादित झाली आहे (अनु. नितीन साळुंखे, मैत्री प्रकाशन, पुणे, २०२१).
 
तुरुंगात असताना त्यांनी रोजनिशी लिहिली. ती डिटेन्ड (१९८१) या नावाने प्रसिद्ध आहे. यात त्यांनी तुरुंगातील दाहक अनुभव चित्रित केले आहेत. कैद्यांना अधिक त्रास व्हावा म्हणून टॉयलेटचे जाड आणि कठीण पेपर दिले जायचे. पण याच कागदावर न्गुगी यांनी डेव्हिल ऑन द क्रॉस ही मातृभाषेतील पहिली कादंबरी लिहिली. नंतर त्यांनी ती इंग्रजीत अनुवादित केली. आपल्याकडेही स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आदी थोर नेत्यांनी आपले महत्त्वाचे लेखन तुरुंगात असतानाच केले. याची आठवण यानिमित्ताने होते.
 
Decolonising the Mind: The Politics of Language in African Literature (१९८६) या शीर्षकाचे त्यांचे पुस्तक आहे. भाषा आणि राजकारण, भाषा आणि निर्मितीप्रक्रिया, साहित्य आणि भाषा हे व असे अनेक प्रश्न या पुस्तकात त्यांनी उपस्थित केले आहेत. भाषिक संदर्भात उपस्थित केल्या जाणार्‍या प्रश्नांसंदर्भात हे पुस्तक खूप महत्त्वाचे आहे. भाषेच्या संदर्भातील त्यांचे चिंतन मूलगामी स्वरूपाचे आहे. १९६० ते १९८५ या पंचवीस वर्षांच्या दीर्घकालीन चिंतनातून न्गुगींनी वसाहतपूर्व आणि वसाहतेतर सांस्कृतिक परंपरेतील भेद या पुस्तकात त्यांनी मांडला आहे.
 
भाषा पायाभूत
 
व्यक्तीच्या जीवनात ज्ञानाची देवाण-घेवाण ही भाषेतून सुरू होते. त्यामुळे भाषा ही एक पायाभूत गोष्ट असते. आपले आणि आपल्या भोवतालाचे प्रश्न, त्याचे अर्थ, आकलन हे आपणाला भाषेतूनच अवगत होतात. यातूनच आपण पुढे जाऊन जगाचाही अर्थ लावू शकतो. जगाशी आपण आपले नाते जोडू शकतो. या सर्वांचा सखोल विचार केल्यास, आपली मातृभाषा हीच आपल्या ज्ञानमार्गाचा पाया असते. म्हणून आपली मातृभाषा पक्की असणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर जगातल्या इतरही भाषा जर आपणाला आल्या, तर ती आपल्या मातृभाषेला संपन्न करणारी भाषिक हत्यारेच असतात. इतर भाषांचे ज्ञान ही गोष्ट अर्थातच आपले आणि जगाचे प्रश्न सोडवणे आणि आपल्या अस्तित्वाचा आणि जगाचा अर्थ लावण्याच्या अनुषंगाने महत्त्वाच्या ठरतात.
 
उदाहरणार्थ, आज इंग्रजी, स्पॅनिश आणि फ्रेंच या जगातल्या महत्त्वाच्या भाषा आहेत. त्या आपण प्राप्त केल्या तर ही चांगलीच गोष्ट आहे. इंग्रजी भाषेला 
‘वाघिणीचे दूध’ आणि ’जगाची खिडकी’ (a window on the world) म्हटले जाते; पण या सगळ्या परकीय भाषा वर्चस्वाच्या भाषा आहेत हे ध्यानात ठेवायला हवे. यात असणारे धोके आणि त्याचे होणारे विपरीत परिणाम याची कठोर जाणीव आपल्याला हवी. ही भाषिक हत्यारे आपणाला जपून वापरता यायला हवीत. भाषेच्या माध्यमातून विषमता आणि वर्चस्ववाद हा आपल्या संस्कृतीत पाझरू शकतो. त्यामुळे या हत्यारांचा वापर करत असताना आपणाला काळजी घ्यायला हवी. त्यामुळे भाषिक आणि सरंजामी मानसिकतेचा अंत किंवा किमान त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी मातृभाषेला पर्याय नाही. अशी परखड मते या ग्रंथामध्ये न्गुगींनी मांडलेली आहेत.
 
निर्वसाहतीकरण :
 
निर्वसाहतीकरण हा वसाहतवादाचाच मुद्दा आहे. निर्वसाहतीकरण म्हणजे वसाहतवादाच्या विपरीत परिणामांतून मुक्त होण्याची धडपड करणे. वसाहतवादाचा एतद्देशीय संस्कृतीवर होणारा परिणाम आणि भाषेच्या माध्यमातून साम्राज्यवाद, त्याचे आयाम, प्रतिकृती, संदर्भ आणि मूल्ये अभीसरीत करत असतो. त्याचा एकूण प्रभाव जनमानसात व्यवस्थितरीत्या मुरवला जातो. यातून वंशवादी आणि त्याच त्या ढाच्यांच्या प्रतिमांतून युरोपकेंद्रीय वर्चस्ववादी खोट्या विचारसरणींचा प्रसार होत राहतो. आफ्रिकेतील सर्वसामान्य माणसांच्या कल्याणाचा विचार करायचा असेल तर, युरोपकेंद्रीय खोट्या विचारसरणीचा त्याग करायला हवा असे त्यांचे प्रमुख प्रतिपादन या पुस्तकात आहे. हे आजच्या उत्तर-वसाहतकालीन भारतीय सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय व्यवहाराच्या संदर्भातदेखील तितकेच खरे आहे. वसाहतीकरणामुळे एतद्देशीय भाषा, सत्ता, पर्यावरण, त्यांचे सांस्कृतिक संचित, त्यांच्या क्षमता आणि शेवटी ते स्वतःच यात लोप पावत जातात. एतद्देशीय संस्कृतीचे केवळ जतन करून चालणार नाही, तर त्याचे पुनरुज्जीवनही करणे अत्यावश्यक आहे.
 
ग्रामसंस्कृती अजूनही जिवंत आहे. म्हणून तिचा विकास आपण करायला हवा. त्यासाठी भाषेचा मुद्दा हा कळीचा मुद्दा आहे असे त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे. एक उदाहरण द्यायचे झाल्यास ’मातृभाषेतून शिक्षण’ हा मुद्दा आपणाला घेता येतो. ’ज्ञानाची सखोल देवाण-घेवाण’ ही केवळ मातृभाषेतूनच होऊ शकते हा सिद्धांत या पाठीमागे आहे.
 
आजच्या अति-तंत्रज्ञानीय उत्तर-आधुनिक काळात तर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पण त्याची फिकीर कोणालाच नाही. गेल्या चार दशकांत बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपले पाय या देशात घट्ट रोवले आहेत. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, कृषीक्षेत्र, बाजार, अति-शहरीकरण या व अशा अनेक क्षेत्रात सामान्य माणूस गुरफटून गेला आहे. तो गुदमरून जातो आहे. एकूणच गोंधळलेल्या परिस्थितीत त्याचे जीवन आणि जीवनाचे प्रश्न सापडलेले आहेत. यात सामाजिक माध्यमांनी त्याच्या जाणिवेचा ताबा घेतला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर न्गुगी यांनी उपस्थित केलेले प्रश्न खूप मूलभूत स्वरूपाचे आहेत.
 
निर्वसाहतीकरण मुद्द्याचाच विचार करायचा झाल्यास, मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण होणे अत्यंत आवश्यक आहे. याची आज आपल्याकडे काय परिस्थिती आहे? गेल्या तीन-चार दशकातल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे इंग्रजी शाळांचे खूळ वाढले आहे. याउलट, मराठी माध्यमाच्या शाळा या दुर्बल आणि अशक्त होत चालल्या आहेत. त्या सबल करण्याची आज मोठी गरज आहे. उत्तम इंग्रजी येण्यासाठी किंवा कोणतीही भाषा येण्यासाठी आपली मातृभाषा पक्की असावी लागते. या भाषाशास्त्रीय सिद्धांताकडे दुर्लक्ष केले जाते. आजच्या या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे मुलांना ना धड इंग्रजी येते, ना मराठी, अशी धेडगुजरी परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
जगभरातील लेखकांची पेन इंटरनॅशनल कॉन्फरन्स २०१८ मध्ये झाली होती. या कॉन्फरन्सला न्गुगी येणार होते. पण ऐनवेळी त्यांना व्हीसा नाकारण्यात आला. न्गुगी आणि भारत यांचा जवळचा संबंध राहिलेला आहे. महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू आणि भारतीय इंग्रजी साहित्य त्यांनी अभ्यासले आहेे. आर. के. नारायण, मुल्क राज आनंद, सलमान रश्दी हे इंग्रजीतून लेखन करणारे भारतीय लेखक त्यांनी वाचलेले आहेत. त्यांचा मुलगा पुण्यात शिकायला होता. त्याने बालगंधर्वला नाटकसुद्धा पाहिले होते. ४ एप्रिल २०१८ च्या द् टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात न्गुगींची मुलाखत प्रसिद्ध झाली होती. भाषा आणि संस्कृतीचे आदान-प्रदान हे समतेच्या तत्त्वावर व्हायला हवे. विषमता आणि वर्चस्ववाद टिकवण्यासाठी सत्ता नेहमी समाजातील भाषा आणि संस्कृती-व्यवहारांवर लक्ष ठेवून असते असे त्यांनी या मुलाखतीत म्हटले होते.आजच्या ग्लोबलाइज्ड जगात भाषा आणि भाषा वापराचा मूलभूत विचार आपण करणार आहोत की नाही, हा गंभीर प्रश्न या अनुषंगाने विचारावासा वाटतो.

Related Articles