वारकर्‍यांसाठी जर्मन तंबूची उभारणी   

वाल्हे, (वार्ताहर) : श्री क्षेत्र आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पायी पालखी सोहळाचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम येत्या २५ जूनला वाल्हे (ता. पुरंदर) येथील सुकलवाडी फाट्याशेजारील प्रांगणात होणार आहे. पालखी सोहळ्या दरम्यान पावसाचा फटका टाळण्यासाठी आणि वारकर्‍यांना सुरक्षित व आरामदायी विसावा मिळावा म्हणून या ठिकाणी ५० हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचा जर्मन तंबू अर्थातच वारकरी सेवा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
 
या तंबूंमध्ये मजबूत लोखंडी फ्रेम्स पावसापासून संरक्षण करणार्‍या प्लास्टिक शीट्स, प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, चटई-उशा तसेच मोबाईल चार्जिग पॉइंट अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. जर्मन तंबूची लांबी २५० फूट तर रुंदी १०० फूट आणि उंची ३० फूट आहे. या तंबूत एकाच वेळी हजारो वारकरी मुक्काम करू शकतात. एकंदरीत संपूर्ण व्यवस्था पुणे जिल्हा परिषद स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त सहभागातून उभारण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पावसामुळे उद्भवणार्‍या अडचणी कमी होतील, असा विश्वास वाल्हे येथील सरपंच अतुल गायकवाड यांनी व्यक्त केला.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वारकर्‍यांची सेवा करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र महसूल विभाग महावितरण पोलिस प्रशासन, अशा सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
 

Related Articles