कुठलीही समिती नेमा; पण, हिंदीची सक्ती चालणार नाही : राज   

मुंबई, (प्रतिनिधी) : शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी हिंदी सक्ती चालणार नाही म्हणजे नाही. मग, नरेंद्र जाधव यांची समिती नेमा वा आणखी कोणाची! महाराष्ट्राने व मराठी माणसाने या निर्णयाला ज्या प्रकारे विरोध केला आहे, याची जाणीव जाधव यांनाही असेलच, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला. येत्या ५ तारखेला विजयी मोर्चा होईल, त्यात मी सविस्तर बोलेनच, असेही ते म्हणाले. मात्र, शिक्षणक्षेत्राचे, शाळांचे इतरही अनेक मूलभूत प्रश्न आहेत. त्यावर विरोधी आमदारांनी अधिवेशनात आवाज उठवावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळांमध्ये हिंदी शिकविण्यासंदर्भातील दोन्ही आदेश रद्द केल्याची घोषणा केली. त्रिभाषा सूत्रावर विचार करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचेही ते म्हणाले. 

Related Articles