पाच जणांकडून वाहनांची तोडफोड   

पिंपरी : चिंचवड, वाल्हेकरवाडी परिसरात अज्ञात व्यक्तींनी रस्त्यावर पार्क केलेल्या सुमारे १० ते १२ वाहनांची तोडफोड केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या गावगुंडांनी तोडफोड आणि आग लावतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड करत सोशल मीडियावर केल्याने चिंचवड पोलिसांचा काही धाक उरलाय का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
बुधवारी रात्री अडीचच्या सुमारास एक टोळके वाल्हेकरवाडी परिसरात आले. त्यांनी आरडाओरड करत रस्त्यावर पार्क केलेली चारचाकी वाहने, टेम्पो आणि रिक्षाच्या काचा फोडल्या, तसेच काही दुचाकींना ढकलून नुकसान केले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ शूट करतच ही तोडफोड करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
 
या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. अनेकांनी सोशल मीडियावरून चिंचवड पोलिसांच्या ढिसाळपणावर टीका करत पोलीस आहेत तरी कुठे? असा थेट सवाल उपस्थित केला आहे. मागील काही दिवसांपासून चिंचवड पोलिसांवर अपप्रवृत्तींना पाठीशी घालणे, गस्त कमी असणे, माहिती असूनही गुन्हे रोखण्यात अपयश, अशा स्वरूपाच्या टीका सुरूच होत्या. मात्र, या घटनेने या सर्व टीकांना जोर मिळाला आहे. गुन्हेगार मोकाट, पोलीस बेफिकीर अशीच स्थिती असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
 
गुन्हे शाखेच्या पथकाकडून चौकशी सुरू
 
घटनेनंतर गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकासह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिक कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Related Articles