नक्षलग्रस्त बस्तरपर्यंत आता रेल्वेचे जाळे   

रेल्वे मंत्रालयाकडून पाहणी सुरू

नवी दिल्ली : छत्तीसगढ येथील नक्षलग्रस्त बस्तरपर्यंत रेल्वेचे जाळे आता विस्तारणार आहे. या संदर्भात नुकतीच पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागांत रेल्वे पोहोचणार असल्याचे स्पष्ट होत आहे.छत्तीसगढ आणि तेलंगणतील दुर्गम भागात सुमारे १६० किलोमीटरचा रुळ टाकण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी पाहणी देखील करण्यात आली.  नक्षलग्रस्त सुकमा, दंतेवाडा आणि बिजापूर येथे प्रकल्प राबविला जाणार आहे. 
 
अशा प्रकारचा या भागातील रेल्वेचा पहिला प्रकल्प असल्याने त्याचे महत्त्व वाढले आहे. तेलंगाणातील कोठागुडेम ते छत्तीसगढचे किरंडुल असे १६० किलोमीटर अंतरापर्यंत रुळ टाकण्यात येणार आहे. त्या मार्गाची पाहणी रेल्वेने केली असून केंद्रीय गृहमंत्रालय यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. विभागीय विकास आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने मंत्रालय प्रकल्पाकडे पाहात आहे.
 
छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रकल्पाला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. प्रकल्पामुळे बस्तरमधील नागरिकांना शिक्षण, आरोग्य, व्यापार आणि राज्य स्वयंपूर्ण होण्यास अधिक चालना मिळणार आहे. रेल्वेचे जाळे तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये पसरविण्याची योजना आहे. त्यापैकी सुमारे १३८ किलोमीटरचा पट्टा छत्तीसगढमधून जातो. तो अतिशय दुर्गम आणि विकासापासून वंचित आहे. तेथे रेल्वे पोहोचवून विकासाला चालना देण्याची योजना आखली आहे. दंतेवाडा आणि बिजापूर परिसरात पाहणीचे काम रेल्वेने वेगाने सुरू केले आहे.   
 

Related Articles