पालख्यांमुळे वाहतूक कोंडी होते   

अबू आझमी यांचे वादग्रस्त वक्तव्य 

सोलापूर, (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात आषाढी सोहळ्यासाठी संतांचे पालखी सोहळे पंढरीकडे मार्गस्थ झाले असतानाच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सोलापुरात वारकर्‍यांना चीड आणणारे वक्तव्य करून वादाला तोंड फोडले आहे. पालख्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे, असे वक्तव्य केल्यामुळे आझमी वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम धर्मीय विरोध करत नाही. मात्र, मुस्लिम धर्मीयांनी रस्त्यावर नमाज पठण केल्यावर तक्रारी केल्या जातात आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे इशारे दिले जातात, असेही आझमी यांनी पत्रकारांना सांगितले.
 
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर नमाज पठण करणार्‍यांचा पासपोर्ट रद्द करण्याची धमकी दिल्याचे आमदार आझमी म्हणाले. मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता अबू आझमी यांनी त्यांच्यावर टीका केली. राज्यात आमदार झाल्यावर आणि मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर अशी दोन वेळा शपथ घ्यावी लागते. तरीही राज्यातील मंत्री जातीवाद निर्माण करत आहेत.
 
हिंदी सक्तीबाबत आमदार आझमी म्हणाले, महाराष्ट्रात मराठीचा सन्मान झाला पाहिजे. पण काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत एक हिंदी भाषा होणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी, हिंदी आणि त्यानंतर इंग्रजी असे भाषिक सूत्र हवेे. राज्यातील मराठी मुद्दे समोर करून राजकीय नेते नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 
 
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आमदार आझमी यांनी इराणला पाठिंबा दिला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अनेक पॅलेस्टिनी नागरिकांना भारतात आश्रय दिला होता, असे सांगताना ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी आता इराणला पाठिंबा द्यावा. जेव्हा इस्रायलने गाझापट्टीत हल्ले करून अनेक निष्पाप लहान मुलांना ठार केले. तेव्हा अमेरिकेने इस्रायलला का रोखले नाही ?, असा संतप्त प्रश्नही आझमी यांनी या वेळी विचारला.
 

Related Articles