भारतीय नाट्यकला संस्कृतीचा ठेवा   

डॉ. मंजुषा गोखले यांचे मत

पुणे : भारतीय नाट्यकला ही केवळ एक कला नसून आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. हजारो वर्षांची परंपरा लाभलेली ही कला आजही तितकीच जिवंत आणि महत्त्वाची आहे, असे मत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या साहित्य आणि ललितविद्या शाखेच्या अधिष्ठाता प्रा. डॉ. मंजुषा गोखले यांनी व्यक्त केले.भारतीय नाट्यकलेचा वारसा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नाही. तो आपल्या सांस्कृतिक जडणघडीतून निर्माण झालेला असून आजही जपला जाणारा एक समृद्ध असा सांस्कृतिक ठेवा आहे, असेही यावेळी त्यांनी नमूद केले.
 
‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठ’, ‘केसरी’ आणि ‘हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स प्रा. लि.’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या हेरिटेज वॉक उपक्रमाअंतर्गत ‘भारतीय नाट्यकलेचा वारसा’ या विषयावर डॉ. गोखले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदाचा वॉक ‘वारसा व्याख्यान’ या स्वरूपात सादर करण्यात आला. या उपक्रमाचे सहकार्य श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्राकडून मिळाले.
 
डॉ. गोखले यांनी भारतीय नाट्यकलेचा उगम वैदिक काळात झाल्याचा दाखला देत नाट्यकलेच्या धार्मिक व लौकिक अंगांचा समन्वय कसा झाला, हे विशद केले. त्यांनी भरतमुनींच्या नाट्यशास्त्र ग्रंथाचा सखोल परिचय करुन दिला. संहिता आणि प्रयोग ही नाट्याची दोन मूलभूत अंगे, संवाद, अभिनय, संगीत, नेपथ्य, रस, नाट्यगृह रचना, प्रेक्षक प्रतिक्रिया आदी पैलूंवर भरतमुनींनी घेतलेले विवेचन आजही नाट्यकलेच्या अभ्यासात महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
अश्वघोषापासून आधुनिक काळापर्यंतच्या संस्कृत आणि प्राकृत नाटककारांच्या परंपरेचा त्यांनी आढावा घेतला. याचबरोबर भारतातील विविध प्रांतांतील लोकनाट्यपरंपरा, संगीत आणि नृत्य या कला नाट्यकलेशी निगडीत असून त्यांचा विकासही नाट्यकलेच्या प्रभावाखाली कसा झाला, हे त्यांनी नमूद केले.
 
प्रास्ताविक आणि स्वागत श्री बालमुकुंद लोहिया अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख डॉ. मंजिरी भालेराव यांनी केले. डॉ. अंबरीष खरे यांनी वक्त्यांची ओळख करून दिली. डॉ. मनीषा पुराणिक यांनी सूत्रसंचालन  केले सोनाली सौंदणकर यांनी आभार मानले. हे व्याख्यान श्री बालमुकुंद लोहिया अध्ययन केंद्राच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर (https://www.youtube.com/TMVSanskrit) पाहता येणार आहे.

Related Articles