काटेवाडीत मेंढ्यांचे गोल रिंगण   

अनोख्या परंपरेला हजारो साक्षी

सोमनाथ कवडे 

बारामती : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी काटेवाडीत उत्साहात स्वागत करण्यात आले. या पारंपरिक स्वागताची शान वाढवणारा मेंढ्यांचा रिंगण सोहळा मोठ्या जल्लोषात शुक्रवारी पार पडला. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या अनोख्या परंपरेचा साक्षीदार होण्यासाठी आबालवृद्ध वारकरी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
 
या सोहळ्यातील खास वैशिष्ट्य म्हणजे तुकोबांच्या पालखीला मेंढ्यांकडून गोल रिंगण घालण्याची प्रथा आहे. काटेवाडीतील हा सोहळा संपूर्ण वारीत एक अद्वितीय आणि भक्तिपूर्ण अनुभव मानला जातो. पालखी गावात दाखल होताच, शेकडो मेंढ्या आपोआप गोलाकार रिंगण घालतात आणि त्या माध्यमातून जणू पालखीला अभिवादन करतात, अशी भावना वारकर्‍यांमध्ये आहे.
 
गावातील स्थानिक ग्रामस्थ या रिंगणाच्या आयोजनासाठी खास तयारी करतात. सोहळ्याच्या वेळेस डोंगरकाठावर व शेतांच्या कुशीतून मेंढ्या पालखी मार्गावर आणल्या जातात आणि त्यांची नैसर्गिक शिस्त व गती पाहून उपस्थित भाविक थक्क होतात. जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखीतील ही परंपरा वारकर्‍यांसाठी आध्यात्मिक आणि भावनिक दृष्टीने खूप महत्त्वाची मानली जाते. काटेवाडीत दरवर्षी या सोहळ्याची उत्सुकतेने वाट पाहिली जाते आणि यावेळीही मेंढ्यांच्या नयनरम्य रिंगणाने उपस्थितांची मने जिंकली.
 
वारीच्या मार्गावर अशीच अनोखी आणि भक्तिपूर्ण दृश्ये पाहायला मिळत असल्याने वारी फक्त चालण्याची नव्हे तर अनुभवण्याची तीर्थयात्रा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने आणि श्रद्धेने भरलेला सोहळा पार पडला. परीट समाजाच्या वतीने पालखीच्या स्वागतार्थ धोतरांच्या पायघड्या अर्पण करण्यात आल्या, तर याचवेळी जुनी परंपरा जपत मेंढ्यांचे रिंगण पार पडले.
 
काटेवाडीत दुपारच्या विश्रांतीनंतर पालखीने पुढील प्रवास सुरू केला आहे. आज (शनिवारी) सकाळी बेलवाडी येथील पटांगणात पालखीचे पहिले गोल अश्व रिंगण होणार आहे. 
 

Related Articles