भारताचे मौन चिंताजनक : सोनिया   

नवी दिल्ली : इस्रायलने गाझा आणि इराणमध्ये केलेल्या विध्वंसावर भारताने बाळगलेले मौन चिंताजनक असल्याची टीका काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी केली. भारताचे मौन म्हणजे मूल्यांचा त्याग असेही त्यांनी म्हटले आहे.
 
इराण-इस्रायल युद्धात भारताची भूमिका अस्पष्ट असल्याचे सांगत सोनिया यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे. इराण भारताचा जुना मित्र आहे. आपले खूप चांगले संबंध आहेत. जम्मू-काश्मीरसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर इराणने भारताची साथ दिल्याचा इतिहास आहे, असेही सोनिया यांनी म्हटले आहे. गाझामधील विध्वंस आणि आता इराणवरील हल्ल्यांवर सरकारचे मौन चिंताजनक असल्याचे सोनिया यांनी म्हटले आहे. १९९४ मध्ये इराणने काश्मीर मुद्यावर मानवाधिकार विषयावर संयुक्त राष्ट्र आयोगात भारताची टीका करणारा प्रस्ताव रोखण्यास मदत केली होती. भारत आणि इस्रायल यांच्यात अलीकडच्या काळात राजनैतिक संबंध विकसित झाले आहेत. या दोन्ही देशातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने मध्यस्थ म्हणून काम केले जाऊ शकते.  अजूनही खूप उशीर झालेला नाही. भारताने स्पष्टपणे बोलले पाहिजे, जबाबदारीने वागले पाहिजे आणि पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी आणि संवादाला पुन्हा सुरुवात करण्यासाठी उपलब्ध असलेल्या प्रत्येक राजनैतिक मार्गाचा वापर केला पाहिजे, असेही सोनिया यांनी म्हटले आहे.

Related Articles