ब्रिटनचे ‘एफ-३५ बी’ हेरगिरीसाठी भारतात?   

अमेरिकन बनावटीचे ब्रिटन हवाईदलाचे अत्याधुनिक एफ-३५ बी हे लढाऊ विमान गेल्या १६ दिवसांपासून ऊन,  पावसात केरळमधील तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे आहे. इंधनाची कमतरता असल्याचे सांगत १४ जूनला रात्री हे विमान आपत्कालीन स्थितीत उतरविण्यात आले होते. इंधन भरल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, हे विमान हेरगिरीसाठी भारतात पाठविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. 

एफ-३५ विमान काय आहे? 

लॉकहीड मार्टिनने अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांसाठी विकसित केलेले एफ-३५ बी हे जगातील सर्वांत प्रगत आणि बहुमुखी लढाऊ विमानांपैकी एक आहे. या विमानात हवाई युद्धात आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. ही विमाने रडारवर दिसत नाहीत. एफ-३५ तीन प्रकारांमध्ये येते. पारंपरिक टेकऑफ आणि लँडिंगसाठी डिझाइन केलेले एफ-३५ ए, कमी वेळात टेकऑफ आणि उभ्या लँडिंगसाठी सक्षम एफ-३५ बी आणि वाहक-आधारित  एफ-३५ सी.

इंधनाचा अभाव, तांत्रिक बिघाड की आणखी काही?

या विमानात इंधन भरण्यासह सर्व आवश्यक मदत विमानतळ प्रशासनाकडून पुरवण्यात आली. मात्र, उड्डाणावेळी त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. या विमानाचा वैमानिक भारतीय हवाई दलाच्या अधिकार्‍यांना या विमानाजवळ येऊ देत नव्हता. हे विमान आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याने ते हेरगिरीसाठी भारतात आल्याचा दावा करण्यात आला आहे. 

हेरगिरीचा प्रयत्न? 

ब्रिटनचे एफ-३५ बी विमान भारतात घुसून हेरगिरी करण्याचा प्रयत्न करत होते. हेरगिरीसाठीच हे विमान आपत्कालीन स्थितीत उतरविण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता भारतीय हवाई दलाचे अधिकारी या विमानाच्या कॉकपिटमध्ये प्रवेश करून तपासणी करणार आहेत.  

तांत्रिक पथकाला अपयश 

सुरुवातीला ब्रिटनमधील तंत्रज्ञांनी दुरूस्तीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. आता ब्रिटनमधून एक विशेष अभियांत्रिकी पथक आणि आवश्यक उपकरणे येण्याची वाट पाहिली जात आहे. 

..अन्यथा मालवाहू विमानाने परतणार मायदेशी 

जर ब्रिटनमधील तंत्रज्ञांना विमानातील तांत्रिक समस्या सोडवता आली नाही, तर हे उच्च तंत्रज्ञानाचे लढाऊ विमान लष्करी मालवाहू विमानाने ब्रिटनला नेण्यात येईल. मात्र ही प्रक्रिया विमानाच्या स्थितीवर आणि तांत्रिक मूल्यांकनावर अवलंबून असणार आहे. 

धोरणात्मक आणि तांत्रिक समन्वयावर प्रश्नचिन्ह 

भारतीय भूमीवर आपत्कालीन परिस्थितीत हे विमान उतरण्याची आणि नंतर तांत्रिक कारणांमुळे बराच काळ अडकून पडण्याची घटना घडल्याने दोन्ही देशांमधील सुरक्षा सहकार्य, आपत्कालीन व्यवस्थापन आणि लष्करी समन्वयाशी संबंधित प्रश्न निर्माण झाले आहेत. किंबहुना, भारत आणि ब्रिटनचे संरक्षण अधिकारी या संवेदनशील परिस्थितीला हाताळण्यासाठी सक्रियपणे एकत्र काम करत आहेत.

भारताच्या हवाई संरक्षणाची चाचणी?

इस्रायलने इराणवर हवाई हल्ले केले. आता ब्रिटन आणि अमेरिका देखील इराणवर हल्ला करू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. इराणवर हल्ला करण्यापूर्वी ब्रिटनला या विमानाच्या वैशिष्ट्यांची चाचणी घ्यायची होती, म्हणून ते भारतीय हवाई क्षेत्रात खूप कमी इंधनासह घुसले आणि भारतीय रडारवर ते  दिसताच त्याने आपत्कालीन कॉल केला. भारतीय रडारवर एफ-३५ बी दिसते की नाही, याची चाचणी ब्रिटनने घेतल्याचे सांगण्यात येते. याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.
 

Related Articles