उद्योगनगरीमध्ये ८० इमारती धोकादायक   

पिंपरी : पावसाळा सुरू झाला असून पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल ८० धोकादायक इमारती आढळून आल्या आहेत. त्यात सहा इमारती ह्या अतिधोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर त्या इमारत मालकांना केवळ नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र, हवामान खात्यानुसार यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे धोकादायक इमारतीपासून नागरिकांना धोका झाल्यास प्रशासन जबाबदारी घेणार का? असा सवाल नागरिक उपस्थितीत करत आहेत.  
 
पिंपरी-चिंचवड शहरात गतवर्षी ८८ धोकादायक इमारती आढळून आल्या होत्या. परंतु, या वर्षीची संख्या कमी झाली आहे. महापालिका बांधकाम विभागाने केलेल्या सर्वेक्षणात शहरात ८० धोकादायक इमारती आढळून आल्या. तर अतिधोकादायक ६ इमारती आहेत. इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती केलेल्या ९ इमारत आहेत. इमारत रिकाम न करता दुरुस्ती केलेल्या १६ इमारती आणि किरकोळ दुरुस्ती ४९ इमारतीची झालेली आहे. धोकादायक इमारती स्व:ता पाडलेल्या आणि दुरुस्त करून सुरक्षित झालेल्या ८ इमारती आहेत. आणखी ७२ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यात सहा अतिधोकादायक इमारतींचाही समावेश आहे. पावसाळा तोंडावर असताना इमारतींना प्रशासनाने नोटिसा देण्यापलीकडे ठोस कारवाई केलेली नाही.
 
शहरात पावसाळ्यात धोकादायक इमारती, भिंती कोसळून दुर्घटना घडतात. त्यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून जुन्या इमारती, वाडे, घरे यांचे सर्वेक्षण करून धोकादायक इमारती निश्चित केल्या जातात. आयुक्त शेखर सिंह यांनी बैठक घेऊन अनधिकृत होर्डिंगसह धोकादायक इमारतींची पाहणी करून योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, धोकादायक इमारतींबाबत महापालिकेकडून केवळ माहिती संकलन व नोटिसा देण्याचे कागदी घोडे नाचविले जात आहेत. शहरात या पावसाळ्यापूर्वी एकूण ८० धोकादायक इमारती निदर्शनास आल्या. तर प्रलंबित ७२ प्रकरणामुळे त्या इमारतीमुळे नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
एकही धोकादायक इमारत पाडली नाही...
 
महापालिकेकडून ८० इमारतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी इमारत मालकांनी पाडलेल्या किंवा दुरुस्त केलेल्या इमारतींची संख्या फक्त १६ आहे. उर्वरित धोकादायक इमारतींबाबत कार्यवाही झालेली नसल्याचे समोर आले आहे. तर, या वर्षी महापालिकेने एकही धोकादायक इमारत पाडलेली नाही.
 
पिंपळे गुरव, पिंपळे निलख, वाकडमध्ये सर्वाधिक इमारती...
 
महापालिकेच्या सर्वेक्षणात सर्वाधिक ३४ धोकादायक इमारती ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्‍या वाकड, पिंपळे निलख, पिंपळे गुरव या भागात आहेत. त्यापाठोपाठ ह क्षेत्रीय कार्यालयात १३ , क ७, अ ५, ब ५, ग ६, आणि सर्वांत कमी फ क्षेत्रीय कार्यालयात ३ धोकादायक इमारती आहेत.
 
दरवर्षी कागदोपत्रीच खेळ
 
पावसाळ्यात अनेकदा इमारत कोसळून, भिंती कोसळून दुर्घटना घडतात. त्यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून जुन्या इमारती, वाडे, घरे यांचे सर्वेक्षण करून धोकादायक इमारती निश्चित केल्या जातात. आयुक्त शेखर सिंह यांनी पावसाळ्याच्या पूर्वी अनधिकृत होर्डिंग्जसह धोकादायक इमारतींची पाहणी करून योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, धोकादायक इमारतींबाबत महापालिकेकडून केवळ माहिती संकलन व नोटीस देण्याचे कागदी घोडे नाचविले. प्रत्यक्षात मात्र काहीही कारवाई केलेली नाही.
 
यासंदर्भात शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, शहरातील कोणतीही इमारत सुरक्षित राखण्याची जबाबदारी प्रत्येक इमारत मालकाची आहे. सर्वेक्षणात आढळलेल्या धोकादायक इमारती धारकांना प्रशासनाने नोटीस दिलेल्या आहेत. त्यासाठी इमारतीची तपासणी तज्ञ अभियंत्यांकडून करून घ्यावी. त्यांच्या सूचनेनुसार इमारत दुरुस्त करून घ्यावी किंवा पाडावी. अति धोकादायक इमारतींबाबत प्रशासन कठोर भूमिका घेईल. ज्या इमारतीमुळे सार्वजनिक जीवितास धोका निर्माण होईल, अशी स्थिती उद्भवते, ती पाडली जाते. 

Related Articles