सातार्‍याच्या पश्चिम भागात धबधबे खळाळले   

सातारा, (प्रतिनिधी): निसर्गसौंदर्यांने नटलेल्या जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सातारा, जावळी, महाबळेश्वर आणि पाटणच्या डोंगरदर्‍यात असलेले धबधबे मुसळधार पावसाने ओथंबून वाहू लागले आहे. त्यामुळे त्यांचे सौंदर्य आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी व निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी अनेक हौशी पर्यटक व ट्रेकर्सची पावले या स्थळी वळली आहेत.
 
सातारा जिल्ह्याला तशी निसर्गसौंदर्याची अलौकिक देणच आहे. या परिसरातील कोयनाकाठी अनेक पर्यटन स्थळे आहेत. कास, बामणोली तेथील निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य ही त्यांना भुरळ घालते आहे. यंदा मे महिन्याच्या मध्यापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने कास पठाराच्या सड्यावरून पाणी वाहू लागल्याने तलावाकडे जाणार्‍या पठारालगत असणारा छोटा धबधबा तसेच सड्यावरून पूर्वेला वाहणार्‍या पाण्यामुळे पारंबे फाट्यापासून उजवीकडे चार किमी अंतरावरील एकीव धबधबा कोसळत आहे. यामुळे कण्हेर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.
 
पाऊस सातत्याने कोसळत असल्याने कास परिसरातील एकीवचा धबधबा, दुंद घाटातील पाबळाचा धबधबा, वजराई या प्रसिद्ध धबधब्यांसह कुसुंबी ते कोळघर दरम्यानच्या घाटातील असंख्य धबधबे पूर्ण क्षमतेने कोसळत असून, रस्त्यावरून प्रवास करताना त्यांचे नयनरम्य दृश्य दिसत आहे. पश्चिम घाटात मुसळधार पाऊस चांगलाच रमला असून, दिवसभर धुक्याची दुलई पसरलेली दिसत आहे. दाट धुके अन् त्यात हरवलेल्या निसर्गरम्य डोंगरातून धबधबे कोसळत आहेत. 
 
ठोसेघर तसेच एकीव, भांबवलीपर्यंत असंख्य लहान-मोठे धबधबे मोठ्या प्रमाणावर कोसळत आहेत. सातारा-बामणोली मार्गावर आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणार्‍या कास पठार परिसरात सध्या मुसळधार पाऊस पडत असून, छोटे-मोठे धबधबे फेसाळले आहेत. या धबधब्यासमवेत अनेक पर्यटक पावसात भिजत फोटोसेशन करत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात यंदा मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून, कास परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. कास पठारावर कास तलावाकडे जात असताना असलेल्या वळणावर छोट्या प्रमाणात धबधबा कोसळू लागला आहे. छोटे-मोठे कोसळणारे धबधबे, चोहोबाजूला हिरवीगार दाट झाडी, पावसाच्या अधूनमधून कोसळणार्‍या सरी, वेगाने वाहणारा वारा त्यात सर्वत्र पसरलेले धुके डोळ्याचे पारणे फेडत आहेत त्यामुळे अनेकांचा ओढा या भागात पावसाळी पर्यटनासाठी वळतो आहे.

Related Articles