शेताच्या बांधावरून पडून तापोळ्यात पर्यटकाचा मृत्यू   

सातारा, (प्रतिनिधी) : तापोळा येथे फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी एकाचा दहा फूट उंच शेताच्या बांधावरून पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. दत्तात्रय सर्जेराव रांजणे (वय-५०, रा. कोलेवाडी, ता. जावळी) असे त्यांचे नाव आहे. 
 
शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता तापोळा परिसरातील एका इको टुरिझम रिसॉर्टमध्ये सुधीर उत्तम रांजणे (वय-३४, रा. रांजणी), दत्तात्रय सर्जेराव रांजणे, अमोल नामदेव नवसरे (वय-४७), हनुमंत शंकर रांजणे (वय-६५) हे चार मित्र राहण्यासाठी आले होते. रात्री सात वाजता चौघेही हॉटेलमधून बाहेर पडले वा तासाभरात पुन्हा हॉटेलवर आले. चौघांना रात्री दहा वाजता हॉटेल कर्मचार्‍यांनी जेवणासाठी फोन केला. तेव्हा खोलीवर तिघेच होते. तिघांनी बाहेर पडलेले दत्तात्रय रांजणे यांना जेवणासाठी शोधले असता ते हॉटेलजवळील उंच बांधाखाली पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्याजवळ काही कुत्री जमा झाली होती. 
 
तीन मित्रांनी ती कुत्री हाकलून लावली. त्यानंतर ते तिघे जेव्हा दत्तात्रय रांजणे यांच्या जवळ गेले, तेव्हा त्यांचा चेहरा कुरतडलेला व जखमी दिसला. त्यामुळे त्यांनी दत्तात्रय यांना तपासले असता तिघांचीही खात्री पटल्यावर ही माहिती हॉटेलमधील कर्मचार्‍यांना समजल्यावर त्यांनी मालकाला कळविले. मालकाने तातडीने ही माहिती महाबळेश्वर पोलिसांना दिली. महाबळेश्वर पोलिसांनी या घटनेची माहिती घेऊन आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. 
 

Related Articles