शिराळ्यात नागाची पूजा करू देण्याची मागणी   

सातारा, (प्रतिनिधी) : शिराळ्यात जिवंत नाग पकडून त्यांची पूजा करण्यास परवानगी द्यावी, अटी आणि शर्ती घालून त्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन दिले असून, त्यांच्या कार्यालयाकडून त्याला रविवारपर्यंत सकारात्मक प्रतिसाद न आल्यास सोमवारपासून  कर्‍हाडनजीकच्या विजयनगरमधील वीज केंद्राबाहेर बेमुदत उपोषणास बसणार आहोत. त्याकडे दुर्लक्ष केल्यास राज्यातील वीज उपकेंद्र बंद पाडू, असा इशारा शिराळा तालुक्यातील नाग मंडळांसह सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र माने यांनी पत्रकार परिषदेत दिला.
 
शिराळ्यातील जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याची परवानगी देण्यासह अन्य मागण्यांबाबत येथे सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटना, त्यांच्या पदाधिकार्‍यांची पत्रकार परिषद झाली. त्यात ते बोलत होते. माने यांच्यासह जयदीप पाटील, विनोद कदम, विनायक माने, गणपती माने, चंद्रकांत पवार, अनिल माने आदी पदाधिकारी व संघटना उपस्थित होत्या.
 
शिराळ्यातील नागपंचमीचा उत्सव न्यायालयाच्या आदेशाने बंद आहे. तो सुरू करावा, यासाठी कित्येक वर्षांपासून झटत आहोत. त्यात अपेक्षित यश आल्याशिवाय आता माघार घेणार नाही, असा ठाम निर्धार येथे उपस्थित पदाधिकार्‍यांनी माध्यमांसमोर व्यक्त केला.पाटील म्हणाले, न्यायालयाच्या आदेशाने जिवंत नागाची पूजा बंद झाली. त्यानंतर २०१५ पासून जिवंत नाग पूजेला परवानगी मिळावी, तसे लोकसभेत विधेयक मांडून ते पारित करावे, यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यासाठी परिसरातील ४८ गावांचा पाठिंबा आहे. त्यांचे ठरावही आहेत. पाच वेळा आंदोलन केले आहे. त्यात प्रत्येक वेळी आश्वासनाखेरीज काही हाती पडले नाही. 
 
प्रकाश जावडेकर मंत्री असताना त्यांनी शब्द दिला होता, तोही पाळला नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकीवेळीही केवळ आश्वासन दिले जाते, ते कोणीच पाळत नाही, असा अनुभव आहे. २९ दिवस उपोषण केले. दोन वेळा मोर्चा काढले, तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे थेट राष्ट्रपतींना निवेदन पाठवून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Related Articles