मंचरमध्ये चोरट्यांच्या हल्ल्यात दोघे जखमी   

मंचर, (प्रतिनिधी): काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील गणेशवस्तीवर ज्येष्ठ नागरिक ज्ञानेश्वर भागा जाधव व कमल ज्ञानेश्वर जाधव यांच्या घरी शनिवारी पहाटे चोरीच्या उद्देशाने चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले. अंदाजे सहा ते सात तोळे सोने चोरट्यांनी चोरून नेले असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पारगाव पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
 
काठापूर बुद्रुक येथील गणेशवस्तीवर ज्ञानेश्वर भागा जाधव (वय ७५) व कमल ज्ञानेश्वर जाधव (वय ७०) हे राहतात. शनिवार पहाटे एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजूची खिडकीची लोखंडी जाळी उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर आतील रूममधून हॉलमध्ये येऊन त्या ठिकाणी झोपलेल्या उभयतांवर हल्ला करून जखमी केले. यावेळी कमल जाधव यांच्या गळ्यातील सोने चोरण्याचा प्रयत्न करत असताना कमल जाधव यांनी विरोध केल्याने चोरट्यांनी त्यांच्या पायावर लोखंडी गजाने मारहाण केली. यामध्ये त्यांचा पाय मोडला आहे. तर ज्ञानेश्वर जाधव यांनीही प्रतिकार केल्याने त्यांच्याही पाठीवर चोरट्यांनी मारहाण केली.
 
ही घटना घडल्यानंतर चोरटे निघून गेल्यावर जखमी ज्ञानेश्वर जाधव यांनी नवनाथ जाधव यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर वस्तीवरील ग्रामस्थ जमा झाले. घटना घडल्यानंतर पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास खासगी रुग्णवाहिकेद्वारे जखमी उभयतांना पारगाव शिंगवे येथील ओम रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉ. शिवाजीराव थिटे यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली आहे. काठापुर या ठिकाणी असणार्‍या तांत्रिक अडचणीमुळे गावामध्ये शनिवारी रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे अनेक नागरिकांना चोरी झाल्यानंतर घराबाहेर येणे धोक्याचे वाटत होते. बाहेर काहीच दिसत नव्हते. त्यामुळे अजूनच अडचण निर्माण झाली. चोरी झालेल्या घराच्या पाठीमागे पावसामुळे चिखल झाल्याने चोरट्यांचे पायाचे ठसे दिसून येत आहे. सदर घटनेमुळे परिसरातील नागरिक घाबरले असून नागरिकांमध्ये भीती आहे. या ठिकाणी पारगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने भेट दिली आणि चोरट्याचा शोध घेण्यासाठी कार्यवाही सुरू झाली असल्याचे सांगण्यात आले. एकूण चोरटे तीन होते. तोंडाला मफलर सारखे कापड बांधलेले होते. घराच्या आजूबाजूला एक चप्पल आणि स्वेटर मिळाले. श्वान पथक आले. परंतु माग मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.

Related Articles