भाजपकडून हिमाचलला सावत्र आईसारखी वागणूक : खर्गे   

नवी दिल्ली : ढगफुटी आणि दरड कोसळण्याच्या घटनांनंतर केंद्रातील मोदी सरकारने पुरेसा निधी न देऊन हिमाचल प्रदेशला सावत्र आईची वागणूक दिल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. केंद्र सरकारने हिमाचल प्रदेशातील आपत्तीशी संबंधित थकबाकी तात्काळ प्रभावीपणे द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. 
 
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात ढगफुटी आणि अचानक आलेल्या पुरात मृतांची संख्या 10 वर पोहोचली आहे आणि 34 बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे. मंगळवारी राज्यात ढगफुटीच्या 11 घटना, अचानक पूर येण्याच्या चार घटना आणि दरड कोसळण्याच्या एका मोठ्या घटनेची नोंद झाली. यातील बहुतेक घटना मंडी जिल्ह्यात घडल्या. या घटनांमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. त्यावर खर्गे यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. 
       
खर्गे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्यामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीची बातमी खूप वेदनादायक आहे. सरकार आणि प्रशासन युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. केंद्र सरकारकडे आमची मागणी आहे की, गेल्या काही वर्षांपासून हिमाचल प्रदेशसाठी प्रलंबित असलेली आपत्तीशी संबंधित रक्कम तात्काळ जारी करावी.
  
या वर्षी पाऊस सुरू होण्यापूर्वीच हिमाचल सरकारने केंद्राकडे 9 हजार कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची मागणी केली होती. 2023 च्या दुर्घटनेत काँग्रेस राज्य सरकारने 4 हजार 500 कोटी रुपयांची विशेष मदत जाहीर केली होती; परंतु केंद्रातील मोदी सरकारने राज्याला केवळ 433 कोटी रुपये दिले. आता भाजप 2023 साठी जाहीर केलेल्या 2 हजार कोटी रुपयांचे श्रेय घेण्यात व्यस्त आहे, परंतु मदत रक्कम अजूनही प्रलंबित आहे.भाजप हिमाचल प्रदेशला सावत्र आईसारखे वागवते. भाजप पराभवाचे श्रेय घेण्याऐवजी मदत करेल अशी आशा आहे.
 

Related Articles