व्हॉट्सऍप कट्टा   

खरा श्रीमंत
 
दिनेश हा चौथीतील एक विद्यार्थी. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची. शाळा करून रिकाम्या वेळेत तो एका हॉटेलमध्ये कप-बश्या धुण्याचं काम करत असे. इतर लोकांनी दिलेले जुने कपडे तो वापरत असे. त्याचे शालेय युनिफॉर्मही चार ठिकाणी ठिगळ लावलेले होते, पण ते नेहमीच एकदम स्वच्छ असत.
एके दिवशी वर्गशिक्षक वर्गात आले आणि म्हणाले, मुलांनो, यंदाच्या स्नेहसंमेलनात आपल्या शाळेतील सर्वात गरजू विद्यार्थ्याला आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तुम्हाला कोणाचं नाव सुचवायचं आहे?
 
सर, दिनेश! - वर्गातून एकसुरात आवाज आला.
 
सरांनी दिनेशचं नाव वहीत लिहिलं. मात्र, हे ऐकून दिनेशच्या स्वाभिमानाला ठेच लागली. तो जागच्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, सर, मी गरीब आहे हे तुम्ही कशावरून ठरवलं? फाटके कपडे पाहून? माझा अभ्यास पाहा. अक्षर पाहा. अंकगणित पाहा. पाठांतर पाहा. मैदानी खेळांमधलं माझं कौशल्य पाहा. मग ठरवा, मी गरीब कसा?
 
दिनेशचे ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण बोलणे ऐकून वर्गात शांतता पसरली. सर्वांना आपल्या विचारातील चूक जाणवली. शिक्षकही काही क्षण दिनेशकडे शांतपणे पाहू लागले. नकळत त्यांनी वहीतील त्याचं नाव खोडून टाकले.
 
चार दिवसांनी स्नेहसंमेलनाचा दिवस उजाडला. बक्षीस वितरण सुरू झाले. चित्रकला, वक्तृत्व, निबंधलेखन, मैदानी खेळ - प्रत्येक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारा एकच विद्यार्थी होता - दिनेश!
 
सरांनी अत्यंत अभिमानाने त्याचं नाव पुकारलं. दिनेश नम्रपणे, नतमस्तक होत मंचावर गेला आणि बक्षीस स्वीकारलं.
सर म्हणाले, हाच तो दिनेश - आपल्या शाळेतील सर्वांत गुणी, नम्र आणि ज्ञानश्रीमंत विद्यार्थी!
तात्पर्य : कोणाचीही पारख त्याच्या कपड्यांवरून नव्हे, तर त्याच्या गुणांवरून करावी.
--
सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो. कुणाला ओंजळभर मिळते तर कुणाला रांजणभर, आपण केलेल्या कष्टाचं फळ असत ते,  त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळाला तोच खरे जगणे शिकला...!
---
बायको : अहो, तुम्ही कायम मोबाइलमध्येच असता, माझ्याकडे लक्ष द्या की!
नवरा : अगं, मी तर कायम तुझाच फोटो बघतोय
बायको : हो का? कुठे?
नवरा : गॅलरीत बिफोर मॅरेज आणि ॒आफ्टर मॅरेज असे दोन फोल्डर करून ठेवलेत!
---
स्त्री... एक सिस्टिम...
 
बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का? भारतातल्या घराघरात जे सकाळ-दुपार-संध्याकाळ, सोमवार ते रविवार, रोज-रोज, वर्षानुवर्ष केलं जाणारं पोळी - भाजी - वरण - भात - कोशिंबीर - चटणी - उसळ वगैरे वगैरे, आणि लाडू - चिवडे - मिठाया - पक्वान्न वगैरे वगैरे घडत असतं ते करणार्‍या बायकांची बुद्धिमत्ता किती असते? असा कोणी कधी अभ्यास केला आहे का? 
 
फोडणीला तेल किती घेऊ, मोहरी किती, हिंग किती, हळद किती? तेल तापले ते कसं ओळखायचं?
गॅस किती मोठा, किती लहान, केव्हा कमी - जास्त करायचा, पदार्थ उलथन्याने किती हलवायचा, उलथनं की डाव, का झारा? कढई का पातेलं? 
पदार्थ शिजला हे कसं ओळखायचं?
एका वेळी ४ पदार्थ करायचे असतील तर ते कमीत कमी वेळात व्हावे म्हणून काय आणि कसं करायचं?
ते करत असताना पुढच्या खाण्याच्या वेळी करायच्या पदार्थाचं नियोजन कसं करायचं?
प्रत्येक पदार्थाबरोबर वाढणारा ओट्यावरचा पसारा, खरकटं, चिकटपणा आवरता कसा घ्यायचा?
 
दूध तापत असताना, कुकर शिजत असताना, तेल गरम होत असताना, आपलाच चहा थोडा गार होत असताना लागणार्‍या वेळेचा परफेक्ट अंदाज घेत बाजूला चार भांडी घासणे, एखादी भाजी चिरणे, एखादी यादी करणे, एखाद्या झोपलेल्या माणसाला प्रेमाने उठवणे (किंवा गदागदा हलवून येणे) हा वेळेचा हिशोब कसा करायचा?
मीठ, तिखट, साखर किती घालायचं?
पोळी, चपाती, फुलका, पुरी काहीही करत असताना कणकेच्या गोळ्याचा आकार, आणि लाटल्यानंतर त्याचा होणारा आकार आणि जाडी याची सांगड कशी घालायची?
उरलेल्या अन्नाचं काय करायचं?
 
वातावरण/ऋतू बघून कुठला पदार्थ किती वेळ चांगला राहील, याचा अंदाज कसा बांधायचा?
उगीच पाट्या टाकून स्वयंपाक होत नसतो, स्वयंपाकघर चालत नसतं. गणित आणि विज्ञान या माणसाने शब्दांत आणि आकड्यांत बांधलेल्या गोष्टींना समजून घेऊन त्यात तरबेज होणार्‍यांना हुषार म्हणणारी आपण माणसं, प्रसंगी पूर्ण अशिक्षित असून स्वयंपाकघर हा भयंकर क्लिष्ट विषय उत्तम हाताळणार्‍या बायकाच्या हुशारीला आपण दाद किती वेळा देतो? निसर्गाने दिलेली अंगभूत हुषारी आपल्याकडून इतके काही उत्तम करून घेत असते; पण आपण डिग्री, मार्क, इंग्लिश येणे असली मोजमापं लावून तिच्याकडे पूर्ण काणाडोळा करत असतो. खाण्यापूर्वी, दिवसातून एकदा तरी निसर्गाने आपल्या घराला सढळहस्ते दिलेल्या या बुद्धिमत्तेचे आभार मानावेत.
सर्वच महिलांना समर्पित...
 

Related Articles