वजराई-भांबवली धबधब्यावर ७० रुपयांत मृत्यूचा खेळ   

सातारा,(प्रतिनिधी): जावळी तालुक्यातील निसर्गरम्य धबधबा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्साही, अति उत्साहींची गर्दी होत आहे. व्यावसायिकांचे फायदे होत असले तरी वजराई भांबवली धबधब्यावर सत्तर रुपयात अति उत्साही, व्यसनी युवकांच्या मृत्यूचा खेळ पाहण्यास मिळत आहे. यामुळे हौसेने आलेल्या पर्यटकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. 
 
सुरक्षिततेचा मेळ बसत नसल्याने आक्रीत घडू नये. यासाठी प्रार्थना केली जात आहे. नैसर्गिक वरदान लाभलेल्या जावळी तालुक्यात रस्त्यावर चिखल व पाणी आणि घनदाट जंगलातून पायवाट, हिरवेगार डोंगर, छोटे मोठे धबधबे पावसामुळे निर्माण झाले आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी, सोबत धुक्याची दुलई अनुभवास मिळत आहे. पर्यटकांचा आनंद द्विगुणित होत असला तरी अति उत्साही तरुणांमुळे वजराई भांबवली धबधबा अपघाताच्या प्रतीक्षेत आहे. 
 
संयुक्त वन व्यवस्थापन समिती व वन विभागाच्या वतीने ७० रुपये शुल्क आकारणी केली जात आहे. परंतु, बेधुंद व नशा पान करून आलेल्या तरुणांना आवर घालण्यासाठी समिती व वन विभागाला अपयश आले आहे. सातारा  पोलीस यंत्रणा इथपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे सर्व कारभार अलविदा आहे.  नियमाचे पालन करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. पर्यटकांसाठी टेंट उपलब्ध असून बांबू कुटीचे काम करण्यात आले आहे.

Related Articles