दुसर्‍या कसोटीत कुलदीप यादव खेळणार   

नवी दिल्‍ली : भारत आणि इंग्लंड दोन्ही संघामध्ये मालिकेतील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून एजबेस्टनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला इंग्लंडकडून 5 विकेटनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. दोन्ही डावांमध्ये भारताची मधल्या फळीतील फलंदाजी पूर्णपणे कोलमडली आणि गोलंदाजांचेही प्रदर्शन खूपच खराब राहिले. जसप्रीत बुमराह सोडल्यास बाकी सर्व गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. हेडिंग्लेच्या सामन्यात फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला होता. आता पहिल्या कसोटी सामन्यानंतर एजबेस्टनमध्येही इंग्लंड टीम इंडियाची ताकदच परखण्याच्या तयारीत आहे.
 
एजबेस्टनच्या मैदानातून एक फोटो समोर आला आहे. हा फोटो खेळपट्टीचा आहे. त्यावरून असे वाटते की खेळपट्टी पूर्णपणे फलंदाजांसाठी अनुकूल असणार आहे. हेडिंग्लेसारखीच एजबेस्टनमध्येही धावांची चांगली खेळी होऊ शकते. एजबेस्टनचे मैदान मुळातच फलंदाजीसाठी खूप चांगले मानले जाते. म्हणजेच दुसर्‍या कसोटी सामन्यात धावांचा मोठा डोंगर उभारला जाऊ शकतो. मात्र टीम इंडियासाठी सर्वात मोठी चिंता पुन्हा फलंदाजीच आहे. हेडिंग्ले कसोटी मध्ये दोन्ही डावांमध्ये चांगल्या स्थितीत असूनही भारताने सहजपणे सामना गमावला.
 
एजबेस्टनमधून आलेल्या खेळपट्टीच्या या पहिल्या फोटोनंतर कुलदीप यादवची अंतिम 11मध्ये निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. सपाट खेळपट्टीवर कुलदीप आपल्या फिरकीची जादू दाखवू शकतो. विशेषत: सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी कुलदीप इंग्लंडच्या फलंदाजांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरू शकतो.भारतीय संघाला जर ही मालिका 1-1 ने बरोबरीत आणायची असेल, तर फलंदाजांना अधिक जबाबदारीने खेळावे लागेल. पहिल्या कसोटी सामन्यात टॉप ऑर्डर फलंदाजांनी चांगली खेळी केली होती. 

Related Articles