जगन मोहन रेड्डी यांच्यावरील कारवाईस तूर्तास मनाई   

अमरावती : वायएसआर काँग्रेस पक्षाचे (वायएसआरसीपी) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांच्यावर १ जुलैपर्यंत कोणतीही कारवाई करण्यास मनाई करणारा हंगामी आदेश आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. त्यामुळे, रेड्डी यांच्यावरील कारवाई तूर्तास टळली असून त्यांना हंगामी दिलासा मिळाला आहे.
 
१८ जून रोजी रेड्डी पालनाडू जिल्ह्यातील रेंटापल्ला गावात पक्षातील एका नेत्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले होते. संबंधित नेत्याने वर्षभरापूर्वी टीडीपी नेता आणि पोलिसांच्या कथित छळास कंटाळून आत्महत्या केली होती. रेंटापल्ला गावाकडे जात असताना वायएसआरसीपीचे समर्थक असलेले सी. सिंगय्या हे रेड्डी यांच्या ताफ्यातील एका वाहनाखाली आले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात रेड्डी यांसह अन्य जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. रेड्डी यांनी यास उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच, अटकेपासून संरक्षण मागितले आहे. या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने रेड्डी यांच्यावर १ जुलैपर्यंत कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यापासून मनाई केली आहे. 

Related Articles