अमेरिका युद्धात उतरली   

इराणच्या अणु केंद्रांवर तुफान हल्ले; बंकर ब्लास्टर बाँब टाकले  

वॉशिंग्टन/ तेहरान :  इराण आणि इस्रायल संघर्षात अमेरिका शनिवारी मध्यरात्री अखेर उतरली. ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ सुरु करुन अमेरिकेने इराणच्या तीन महत्वाच्या अणु केंद्रावर तुफानी बाँब हल्ले केले आणि ती उद्ध्वस्त केली. इराणवरील हल्ल्याचा निर्णय दोन आठवड्यांत घेऊ असा इशारा देणार्‍या डोनाल्ड ट्रम्प यांनी अवघ्या दोन दिवसांत आक्रमक हल्ला इराणवर चढविला आहे. त्यासाठी बी-२ बाँबर या विमानांचा वापर केला. बंकर ब्लास्टर बाँबचा मारा करुन अणु केंद्रे बेचिराख केली.
 
इराणचा अणु कार्यक्रम बंद करण्यासाठी अमेरिकेने फोर्डो, नतांज आणि इस्फहान येथील अणु केंद्रावर हल्ले केले. त्यासाठी बी -२ स्टेल्थ बाँबरचा विमानांचा वापर केला. विमानातून ३० हजार पाऊंड वजनाचे (१३ हजार किलोचे) बंकर ब्लास्टर बाँब घटनास्थळी टाकण्यात आल्याचे सांगण्यात येते. भीषण स्फोटानंतर आगीचे लोळ उठले आणि केंद्रे उद्ध्वस्त झाली.
 
अणुबाँब तयार करण्यापर्यंत इराण पोहोचल्याचा आरोप करत इस्रायलने आठवड्यांपूर्वी १३ जून रोजी नतांज, इस्फहान व फोर्डो येथील आण्विक प्रक़ल्प आणि लष्करी ठाण्यांवर जोरदार हवाई हल्ले केले होते. त्यात ड्रोन, लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांचा स्वैर वापर केला आहे. हवाई संरक्षण व्यवस्था आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपक वाहने नष्ट केली. त्यामुळे इारणची संरक्षण व्यवस्था कमकुवत झाली होती. तसेच इराणच्या हवाई क्षेत्रावर संपूर्ण नियंत्रण मिळविल्याचा दावा केला होता. 
 
मात्र, फोर्डो, नतांज आणि इस्फाहान येथील  विशेषत: फोर्डो येथील भूगर्भात संरक्षित असलेले केंद्र याचा समावेश होता. प्रकल्प इस्त्रालयला संपूर्णत: नष्ट करता आले नाहीत. त्यासाठी अधिक भेदक आणि संहारक अशा बंकर ब्लास्टर बाँबची गरज होती. ते इस्रायलकडे नव्हते. त्यांची मागणी त्याने अमेरिकेकडे केली होती. याच दरम्यान, अमेरिकेने स्वत:हून पुढाकार घेत बी २ स्टेल्थ बॉबर विमानांचा वापर अणु केंद्रावरील हल्ल्यासाठी केला. त्यासाठी कोणत्या बाँबचा वापर केला ? याचा तपशील  व्हाइट हाऊस अथवा संरक्षण संस्था पेंटागॉनने दिलेला नाही. दरम्यान, प्लॅनेट लॅब पीबीसीने उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रात अणु केंद्राचे नुकसान झाल्याचे दिसते. फोर्डो येथील अणु केंद्रावर हल्ला होण्यापूर्वी पर्वतीय भागाचा परिसर चॉकलेटी रंगात होता. हल्ल्यानंतर तो करडा झाल्याचे दिसून आले. या संदर्भातील दोन्ही छायाचित्रे प्रकाशित केली असून त्यात ही बाब प्रकर्षाने दिसून येते. 

कारवाईवर नजर

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांनी व्हाइट हाऊसमध्ये बसून इराणवरील कारवाईवर नजर ठेवली होती. ट्रम्प यांच्यासोबत उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी देखील कारवाईचे निरीक्षण केले. 

किरणोत्सर्ग नाही 

तीनही अणु केंद्रांवर हल्ला झाल्याचे आणि त्यांचे नुकसान झाल्याचे इराणच्या अणु ऊर्जा संघटनेने सांगितले असून हल्ल्यानंतरही अणु कार्यक्रम सुरूच राहिल, असे स्पष्ट केले. इराण आणि अमेरिकेच्या घडामोडींवर लक्ष ठेवणार्‍या तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, परिसरात किरर्णोत्सर्गाचे चिन्हे नाहीत. 

संघर्षाचे रुपांतर युद्धात नको : मोदी

इराण परिसरात आणखी संघर्ष भडकेल, अशी चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली असून संघर्षाचे रुपांतर युद्धात होता कामा नये. त्याबाबत दक्षता घ्यावी, उपाययोजना कराव्यात, असेही सांगितले. अणु केंद्रावरील हल्ल्यानंतर मोदी यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्किन यांच्याशी त्यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधला  चर्चा आणि राजनैतिक पातळीवर तोडगा काढता येेणे शक्य आहे. त्या दिशेने पावले टाकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

प्रत्त्युत्तर दिल्यास गंभीर परिणाम : ट्रम्प 

इराण परिसरातील अमेरिकेच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करुन प्रत्युत्तर देऊ नये. तसे केल्यास अमेरिका आणखी प्राणघातक आणि प्रखर हल्ले चढवेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. इराणवरील हल्ल्यानंतर देशाला संबोधनपर भाषणात ते म्हणाले, इराणची अणु केंद्रे नष्ट करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्या माध्यमातून दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या इराणचा अणु कार्यक्रम थांबवण्यात यश आले. पर्यायाने जगाला भेडसावणार्‍या अणुबाँबचा धोका कमी झाला आहे. महत्वाची अणु केंद्रे नष्ट केली आहेत. ही बाब आमच्या लष्कराच्या सामर्थ्याची चुणूक होती. ते म्हणाले, गेल्या आठ दिवसांतील चित्र पाहता एक तर शांतता नांदेल किंवा दु:ख पसरेल, असे इराणची आवस्था होती. हल्ल्यातून आणखी काही लक्ष्य सुटलेली आहेत. जी पल्ल्यापलिकडे होती. शांतता तातडीने स्थापन होणार नाही. उर्वरित ठिकाणे वेगाने आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने अचूक नष्ट करावी लागतील. या वेळी त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांचे सहकारी यांचे कौतुक केले. एकत्रित काम केल्यामुळे इस्रायलला आण्विक धोक्यापासून वाचविण्यात यश आले. 

असा केला हल्ला 

अमेरिकेने हिंद महासागरातील दियोगो गार्शिया या हवाई तळाचा वापर हल्ल्यासाठी केला. अमेरिकेची सहा बी -२ बाँबर विमाने या तळावर सुमारे ३४ तासांचा प्रवास करुन उतरली होती. दरम्यान, विमानात आकाशात इंधन भरण्यात आल्याने ती इराणवर हल्ल्यासाठी रवाना होत असल्याचे संकेत मिळत होते. त्यासाठी विमानांनी अमेरिकेतून दियेगो गार्शिया तळाकडे उड्डाण केले होते. शनिवारी मध्यरात्री आक्रमक कारवाई करत अणु केंद्रांना लक्ष्य करुन ती नष्ट केली. तत्पूर्वी पाकिस्तानने विमानांना उड्डाणासाठी हवाई क्षेत्र खुले करुन दिले असल्याचे वृत्त आहे. त्याचा वापर विमानांनी केल्याचे मानले जाते. दरम्यान, अमेरिका १२५ लढाऊ विमाने वापरतो. त्यापैकी बी -२ बाँबर  विमाने आहेत. 

अमेरिकेचा पाकिस्तानकडून निषेध

लाहोर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचे नोबेल द्यावे, अशी शिफारस पाकिस्तान सरकारने केली होती. इराणच्या अणु केंद्रावरील हल्ल्यानंतर २४ तासांत कोलांट उडी मारत त्यांनी अमेरिकेचा निषेध केला. मात्र, या हल्ल्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानच्या विमानतळाचा  वापर केल्याचे सांगितले जात आहे. यातून पाकिस्तानचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याची टीका करताना परिसरात हिंसाचार उफाळेल, असा इशाराही दिला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेच्या हल्ल्याचा  आणि त्यानंतर इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा निषेध करत आहोत. 

इराणचे परराष्ट्र मंत्री रशिया दौर्‍यावर

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघाची  अणु केंद्रावरील हल्यानंतर रविवारी रशियाला तातडीने रवाना झाले. ते आज (सोमवारी) रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार अहेत. तुर्की येथील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, दोन्ही देशांचे लष्करी संबंध मोठे आहेत. भागीदारी आणखी वाढावी, या उद्देशाने मी रशियाला जात आहे.   

परिस्थिती चिघळली

बीजिंग : इराणच्या अणु केंद्रावरील हल्ल्यामुळे पश्चिम आशिया आणि परिसरातील परिस्थिती चिघळली आहे, अशी प्रतिक्रिया चीनने व्यक्त केली. इराण आणि इस्रायल यांच्या पुरता संघर्ष मर्यौदित होता. त्यात अमेरिकेच्या हल्ल्यामुळे तणावात भर पडली आहे. एकंदरीत परिस्थिती अधिक बिघडल्याचे चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. 
 

 

Related Articles