पुणे : वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ’इमेल’ व ’एसएमएस’चा पर्याय निवडणार्या लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेमध्ये ५ लाखांचा टप्पा गाठला आहे. या योजनेत सोमवार पर्यंत सहभागी झालेल्या ५ लाख ३ हजार ७९५ वीजग्राहकांना ६ कोटी ४ लाख ५५ हजार रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी ’गो-ग्रीन’ योजनेत सहभागी होण्याची ऑनलाइन सुविधा व योजनेची सविस्तर माहिती महावितरणच्या मोबाईल अॅप व www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी ’गो-ग्रीन’ योजनेमध्ये सहभागी व्हावे व पर्यावरणपूरक योजनेत योगदान द्यावे असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी केले आहे. वार्षिक १२० रूपयांचा फायदा - महावितरणकडून पर्यावरणपूरक ’गो-ग्रीन’ योजनेतून वीज बिलासाठी छापील कागदाचा वापर कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. कागदी बिलाऐवजी फक्त ’इमेल’ व ’एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांचा वीजबिलामध्ये वार्षिक १२० रुपयांचा आर्थिक फायदा होत आहे. विशेष म्हणजे गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या पहिल्याच वीजबिलामध्ये पुढील १२ महिन्यांची म्हणजे १२० रुपयांची सवलत एकरकमी देण्यात येत आहे. पूर्वी ही सवलत प्रत्येकी १० रुपये प्रत्येक बिलामध्ये मिळत होती.
Fans
Followers