माउलींचा पालखी सोहळा फलटण नगरीत विसावला   

सातारा, (वार्ताहर) : पहाटेच्या आरतीनंतर तरडगावहून निघालेला श्री संतश्रेष्ठ माउलींचा पालखी सोहळा शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास फलटण नगर परिषदेच्या हद्दीत जिंती नाका येथे पोहोचला. येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्यासह नगरवासीयांनी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता सोहळा विमानतळावर एक दिवसाच्या मुक्कामासाठी  विसावला.
 
शनिवारी पहाटे तरडगाव येथे माउलींचे पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांच्या हस्ते माउलींची नित्य पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी ६ वाजता हा सोहळा ऐतिहासिक फलटणनगरीकडे मार्गस्थ झाला. स्वच्छ व निरभ्र वातावरणात निघालेला हा पालखी सोहळा दत्त मंदिर, काळज येथे आला. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर तो सुरवडीकडे मार्गस्थ झाला. सकाळी ९ वाजता सोहळा सुरवडी येथे पोहोचल्यानंतर सोहळ्याने सकाळची न्याहरी घेतली. त्यानंतर सोहळा नैवेद्य व विश्रांतीसाठी सकाळी ११.३० वाजता निंभोरे ओढा येथे पोहोचला. येथे सोहळ्याने दुपारचे भोजन व विश्रांती घेतली.
 
सकाळपासून वाटचालीत कधी तळपता सूर्य तर मध्येच कधीतरी ढगाळ वातावरण निर्माण होत होते. वारकर्‍यांना वाटचालीत पाऊस पडेल, अशी आशा होती; परंतु प्रचंड उकाड्यामुळे वारकर्‍यांना वाटचालही असह्य झाली होती. मेघराजाच्या जलधारा अपेक्षित असलेल्या वारकर्‍यांना मात्र घामांच्या धारांचा जलाभिषेक होत होता. तरीही वारकर्‍यांचा उत्साह मात्र कायम होता. मुखी ‘विठ्ठल नामा’चा जयघोष व साथीला टाळ, मृदुंगाचा गजर यातच वारकरी पंढरीकडे मार्गस्थ होत होते. दुपारी ३ वाजता वडजल येथील विश्रांती घेऊन सोहळा पुढे मार्गस्थ झाला. सायंकाळी ५ वाजता फलटण नगरपालिकेच्या हद्दीत जिंती नाका येथे अश्व पोहोचले. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता माउलींची पालखी जिंती नाका येथे पोहोचली. येथे फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्यासह नगरवासीयांनी सोहळ्याचे उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत केले.

Related Articles